शाळा ऑनलाइन, फी मात्र पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:47+5:302021-06-18T04:24:47+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. तर काही २८ जूनला सुरू होत आहेत. ऑनलाइन ...
बुलडाणा: जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या काही शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. तर काही २८ जूनला सुरू होत आहेत. ऑनलाइन पद्धतीने शाळा असल्या तरी विद्यार्थ्यांकडून फी मात्र नियमित शाळेइतकीच घेतल्या जात आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
यंदाही कोरोनाच्या संसर्गामुळे शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळणार नाही. जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू होत आहे; परंतु काही इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा १४ जूनपासूनच ऑनलाइन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची लगबग सुरू आहे; परंतु प्रवेश घेत असताना पालकांसमोर एकच प्रश्न येतो, तो म्हणजे शाळेच्या फीचा. यंदाही ऑफलाइन शाळा नाहीत. तरीदेखील शाळांकडून ऑनलाइन क्लासची फी न घेता पूर्ण फी घेतली जात आहे. ऑनलाइन शाळा असतानाही फी तेवढीच कशी काय, असे प्रश्न अनेक पालकांना पडले आहेत.
--शिक्षण विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष--
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क पूर्तता न केल्याने त्या विद्यार्थ्यास शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवता येत नाही; परंतु काही ठिकाणी फी भरल्यानंतरच विद्यार्थ्यांना या क्लाससाठी प्रवेश दिला जात आहे. वास्तविक फी रखडल्याच्या कारणावरून कोणालाही प्रवेश नाकारू नये, असे शिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
--ऑनलाइनमुळे असा वाचतो शाळांचा खर्च--
ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे शाळांचा वीज बिल, पाणी बिल, सफाई खर्च, सुरक्षेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. याबरोबरच अनेक खासगी शाळा वाहतूक, लॅब फी, लायब्ररी फीचा खर्चही मुलांकडून वसूल करतात.
----
जिल्ह्यात २८ जूनपासून ऑनलाइन शाळा सुरू होणार आहेत. शैक्षणिक शुल्कासाठी कोणत्याही शाळेत विद्यार्थ्याची अडवणूक करता येत नाही. त्यांचे प्रवेश थांबविता येणार नाहीत. असा प्रकार आढळून आल्यास पालकांनी तक्रार करावी.
सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
---
मुलाचे भवितव्य शाळेच्या हातात, तक्रार कोण करणार?
शैक्षणिक शुल्कासाठी मुलाचा प्रवेश थांबवला तरी पालक शाळेची तक्रार करू शकत नाहीत. कारण मुलाचे भवितव्य ‘त्या’ शाळेच्या हातात असते. त्यामुळे शिक्षण विभागाने तक्रारीची वाट न पाहता, चौकशी करणे आवश्यक आहे.
शत्रुघ्न देशमुख, पालक.
------
पूर्वी सकाळी ११ ते ५ अशी पूर्ण वेळ शाळा राहत होती; परंतु आता तीन ते चारच तासिका घेण्यात येतात. त्यातही पूर्ण फी भरावी लागत आहे. शाळेचा उत्तरपत्रिकेसह इतर अनेक खर्च ऑनलाइनमुळे वाचला आहे.
ज्ञानेश्वर पवार, पालक.
-----
जिल्हा परिषद शाळा १४३८
नगरपालिका शाळा १०५
खासगी अनुदानीत ३९८
खासगी विनाअनुदानीत ८२