गावकर्यांच्या सहकार्यातून शाळेचे नंदनवन
By admin | Published: September 5, 2014 12:24 AM2014-09-05T00:24:24+5:302014-09-05T00:24:24+5:30
बोराखेडी येथील शालेय परिसरातसह शाळेचे नंदनवन करून नवा आदर्श निर्माण केला.
मुरलीधर चव्हाण / मोताळा
बोराखेडी येथील भिल्ल, वैदु व वडार समाजाच्या पालकांच्या भेटी घेवून गावकर्यांच्या मदतीने शालेय परिसरातसह शाळेचे नंदनवन करणारे शिक्षक अनिल कन्हीराम चव्हाण यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. बोराखेडी हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सन २00४-0५ मध्ये भिल्ल वस्तीमध्ये उभारलेल्या या शाळेत कुठल्याच सुविधा नव्हत्या. त्यात भिल्ल, वडार व वैदु या आदिवासी समाजाचा व्यावसाय मजुरी करणे व दारू गाळणे एवढाच. अशा स्थितीत शाळेबद्दल आपुलकी निर्माण करून आदिवासी प्रवर्गातील वस्तीमध्ये शाळेचे वातावरण आनंददायी व शैक्षणिकदृष्ट्या सुखावह करण्याचे काम अनिल चव्हाण हे सहकारी शिक्षक व गावकर्यांच्या मदतीने केले. आज रोजी भिल्ल वस्तीमधील शाळेचा परिसर हिरवागार दिसत असतो.सर्व प्रकाराच्या सुविद्या पाहावयास मिळतात. शाळेमधील बोलक्या भिंतीचा उपक्रम तालुकाभरातील सर्व शाळांसाठी आदर्श ठरला आहे. शाळेचे वातावरण आनंददायी असून शैक्षणिकदृष्टया सुखावह झाल्यामुळे २५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील १५0 विद्यार्थी हे भिल्ल, वैदु व वडार समाजाचे असून आता अंत्री गावातील ७५ विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शालेय परिसर हिरवागार करण्यासाठी स्वत: शिक्षक अनिल चव्हाण यांनी सुरूवातीला पाच हजार रूपयाचे झाडे आणून वृक्षारोपण केले होते. वर्षभर शिक्षकांच्या वाढदिवशी एका झाडाचे वृक्षारोपण केले जाते. गावकर्यांच्या मंदतीने पिण्याच्या पाण्याचा व संरक्षण भिंतीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.जि.प. कडून साहित्य व अनुदान मिळेल काय? याची प्रतीक्षा न करता गावातून लोकवर्गणीच्या माध्यमातून शहरी भागाला साजेल व लाजवेल असे साहित्य या शाळेमध्ये खरेदी करून उपलब्ध करून दिले आहे.