शालेय खेळांचा खेळखंडोबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:49 PM2017-08-27T22:49:34+5:302017-08-27T22:51:29+5:30
शालेय खेळांची संख्या सध्या ६३ आहे; मात्र या खेळांचे साहित्य शाळांमध्ये उपलब्ध होत नाही. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सन २0१७-१८ या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील १३ क्रीडा प्रकारांमध्ये नवीन वयोगटांचा समावेश केला आहे; परंतु शाळेला मिळणार्या नॉन सॅलरीतून शालेय साहित्याचा खर्च भागत नाही. क्रीडा साहित्याअभावी नव्याने समाविष्ट खेळांचाही खेळखंडोबा निर्माण झाला आहे.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शालेय खेळांची संख्या सध्या ६३ आहे; मात्र या खेळांचे साहित्य शाळांमध्ये उपलब्ध होत नाही. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सन २0१७-१८ या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील १३ क्रीडा प्रकारांमध्ये नवीन वयोगटांचा समावेश केला आहे; परंतु शाळेला मिळणार्या नॉन सॅलरीतून शालेय साहित्याचा खर्च भागत नाही. क्रीडा साहित्याअभावी नव्याने समाविष्ट खेळांचाही खेळखंडोबा निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साधण्याच्या दृष्टीने शाळेत शारीरिक शिक्षणासारखा विषय ठेवण्यात आला आहे. शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून शाळेत विविध खेळ शिकविले जातात. त्यानुषंगाने शालेय क्रीडा प्रकारामध्ये ६३ खेळांचा समावेश आहे; मात्र या खेळांपासून क्रीडा शिक्षकच अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सन २0१७-१८ या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील १३ क्रीडा प्रकारांमध्ये नवीन वयोगटांचा समावेश केला आहे. नव्याने सामाविष्ट केलेल्या खेळांचे साहित्य जिल्ह्यातील शाळांमध्ये उपलब्ध नसल्याने हे खेळ कागदारवच राहण्याची परिस्थिती आहे. १४, १७ व १९ या वयोगटांसाठी नव्याने खेळ समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये कुस्ती फ्री स्टाइल, कुस्ती ग्रीकोरोमने, रग्बी, रस्सीखेच, पॉवर लिफ्टिंग, डॉज बॉल, फिल्ड आर्चरी, कॉर्फ बॉल, कुडो, मिनी गोल्फ, स्पीड बॉल, टेंग सु डो, वुडबॉल या खेळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नेमणे गरजेचे असून, जिल्ह्यात सध्या जवळपास ४५0 क्रीडा शिक्षक कार्यरत आहेत; परंतु शाळा, महाविद्यालयांना खेळाचे साहित्यच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना या खेळापासून वंचित राहावे लागत आहे. शाळा-महाविद्यालयांना नॉन सॅलरीतून खडू, फळा, झाडू यासारख्या साहित्याबरोबर क्रीडा साहित्य खरेदी करता येते; मात्र नॉन सॅलरीच अत्यंत कमी देण्यात येत असल्याने शाळा- महाविद्यालयांमध्ये क्रीडा साहित्य खरेदी केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून शालेय क्रीडा स्पर्धेतील क्रीडा प्रकारांमध्ये होणारे नवीन बदल ह्या शाळा, महाविद्यालये स्वीकारू शकत नाहीत.
नवीन खेळांमुळे क्रीडा शिक्षकच अडचणीत
शालेय खेळांमध्ये ६३ खेळांचा समावेश आहे. तसेच शालेय स् तरावर होणार्या क्रीडा स्पर्धेतही वारंवार वेगवेगळे बदल करण्यात येत आहेत. शालेय खेळांमध्ये होणार्या बदलानुसार सदर खेळांचे साहित्य शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहचविण्यात येत नाही. तसेच नवीन क्रीडा प्रकारांविषयी शारीरिक शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे; मात्र तेसुद्धा वेळेवर दिल्या जात नाही. परिणामी नवीन येणार्या खेळांमुळे क्रीडा शिक्षकच अडचणीत सापडत आहेत.
वाढत्या क्रीडा प्रकारात मैदाने मात्र गायब
शालेय क्रीडा स्पर्धेत क्रीडा प्रकारांचे प्रमाण वाढतच आहे. तालुका व त्यानंतर जिल्हास्तरावर लाखो रुपये खर्च करून क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात; मात्र अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांकडे मैदानेच उपलब्ध नाहीत. ज्या ठिकाणी मैदाने आहेत त्यावर अतिक्रमण थाटलेले पाहावयास मिळते. अनेक शाळा, महाविद्यालयात मैदानांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना येणार्या नवीन खेळाचा लाभ घेता येत नाही.
जिल्ह्यात जवळपास ४५0 शारीरिक शिक्षक कार्यरत आहेत; परंतु काही शाळांमध्ये क्रीडा साहित्यांचा अभाव असल्याने शालेय खेळ खेळण्यासाठी अडचणी येतात.
- एन.के . देशमुख,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.