शिक्षकासाठी पंचायत समितीमध्येच भरली शाळा; नियुक्तीचे पत्र घेऊनच विद्यार्थी परतले
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 31, 2023 04:25 PM2023-08-31T16:25:00+5:302023-08-31T16:25:57+5:30
गट विकास अधिकारी यू. एस. देशमुख यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी शाळा भरवून आंदोलन केले.
लोणार : तालुक्यातील आरडव येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने संतापलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत लोणार पंचायत समितीमध्येच ३१ ऑगस्ट रोजी शाळा भरवली. शिक्षकाच्या नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर विद्यार्थी माघारी परतले.
गट विकास अधिकारी यू. एस. देशमुख यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी शाळा भरवून आंदोलन केले. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत पंचायत समितीच्या आवारातून न जाण्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता. दरम्यान, सहायक गटविकास अधिकारी शरद घुगे, केंद्रप्रमुख जंगल सिंग राठोड, मुंढे, कुंभारे, पंचायत समितीचे अधीक्षक रवींद्र मापारी यांनी पालकांची अडचण लक्षात घेऊन जांभूल जिल्हा परिषद शाळेवरील अतिरिक्त शिक्षक विष्णू भिवाजी तारे यांची तत्काळ नियुक्ती केली. त्यानंतरच पालक आणि विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शैलेश सरकटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर ढाकने, विनोद सरकटे व पालक उपस्थित होते.
१४० शिक्षकांकडे अतिरिक्त काम
लोणार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील १४० शिक्षकांकडे मतदार यादी निरीक्षकाचे (बीएलओ) अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळत नाही.
आरडव शाळेवर ४२ विद्यार्थी, शिक्षकां अभावी नुकसान
आरडव येथील शाळेवर जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक पडळकर यांची ऑनलाइन बदली झाली आहे. मात्र, जळगाव जामोद येथील शाळेवर पर्यायी शिक्षक नियुक्त न झाल्याने पडळकर यांना या शाळेवरून सोडण्यात आलेले नाही. आरडव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये १ ते ४ पर्यंत वर्ग असून ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
लोणार तालुक्यात शिक्षकांची १४ पदे रिक्त
तालुक्यात शिक्षकांची १४ पदे रिक्त असून १३ शिक्षक अतिरिक्त आहेत. तर २१ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज जिल्हा स्तरावर पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या अर्जावर कोणताही निर्णय न झाल्याने ही पदे अजूनही रिक्त आहे.
तालुक्यातील उपलब्ध असलेल्या १३ अतिरिक्त शिक्षकांपैकी एका शिक्षकाची आरडव येथील शाळेवर शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.
-उमेश एस. देशमुख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती लोणार.