वझर आघाव येथे शाळाबंद आंदोलन
By admin | Published: August 23, 2016 11:51 PM2016-08-23T23:51:41+5:302016-08-23T23:51:41+5:30
लोणार तालुक्यातील विद्यार्थ्यांंनी केली शिक्षकांची मागणी.
लोणार (जि. बुलडाणा), दि. २३: तालुक्यातील वझर आघाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कायमस्वरुपी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत तिन वेळा जनआंदोलन करण्यात आले. तरीही पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून दखल घेण्यात आली नाही. यामुळे अखेर २३ ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.
वझर आघाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्ग असून, २२५ पटसंख्या आहे. शाळेसाठी ८ पदे कायमस्वरुपी मंजूर असताना अनेक महिन्यापासून फक्त ६ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी अनेकवेळा निवेदने देऊन जन आंदोलनही करण्यात आले. परंतु गेंड्याची कातडी पांघरुन बसलेल्या पंचायत समिती व जि.प.वरिष्ठ अधिकार्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. अखेर २३ ऑगस्ट २0१६ रोजी विद्यार्थ्यांंसमवेत शाळा बंद आंदोलन गावकर्यांना करावे लागले. साखर झोपेत असलेल्या केंद्रप्रमुख पी.एम.मापारी व गटशिक्षणाधिकारी एम.आर.जाधव यांना उशिरा जाग आल्याने त्यांनी दुपारी १२ वाजता वझर आघावकडे धाव घेतली. गावकर्यांसोबत चर्चा करुन १ शिक्षक देण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. विद्यार्थ्यांंचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन मंजूर पदे भरण्यात येतील, अशा आश्वासनामुळे गावकर्यांनी शाळा बंद आंदोलन मागे घेतले.