मधमाश्या उठल्याने शाळा बंद; पालक, विद्यार्थ्यांना नाहक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 05:25 PM2023-03-20T17:25:00+5:302023-03-20T17:25:36+5:30
सहकार विद्यामंदिराच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून आगेमोहोळ बसलेले आहे.
पिंपळगाव राजा : सहकार विद्यामंदिराच्या आवारात वर्गखोलीच्या बाहेरील भागात असलेले आगेमोहोळ (मधमाश्या) सोमवारी सकाळी उठल्याने शाळा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला.
सहकार विद्यामंदिराच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून आगेमोहोळ बसलेले आहे. मुख्याध्यापक प्रशांत निकम यांना याबाबत शिक्षक व कर्मचाऱ्यांना माहिती दिली. आठवडाभरापासून आगेमोहोळाला उठविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र योग्य ते नियोजन न केल्याने दोन ते तीन विद्यार्थ्यांना व काही शिक्षकांना शुक्रवारी या आगेमोहोळाच्या माश्यांनी चावा घेतला.
रविवारी रात्री मुख्याध्यापक निकम यांनी परिसरातील एका व्यक्तीला बोलावून हे आगेमोहोळ जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धेच जळाल्याने उर्वरित आगेमोहोळ हे शाळेच्या आवारात ठिकठिकाणी बसले. त्यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा आगेमोहोळ उठल्याने संस्थेच्या आवारात एकच तारांबळ उडाली. विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी व पालक संस्थेच्या कार्यप्रणालीवर नाराज झाले. आगेमोहोळाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी संस्थेकडे केली आहे.