गटशिक्षणाधिकाऱ्याच्या पत्राला संस्थाचालकांकडून केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:53 PM2019-06-21T14:53:07+5:302019-06-21T14:53:25+5:30
विनाअनुदानीत शिक्षण संस्थाचालक पालकांना पुस्तके, लेटरबूक, गणवेश व इतर शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून घेण्याची सक्ती करतात.
- विजय मिश्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरात व तालुक्यात अनेक शिक्षण संस्था या इंग्लिश माध्यमाच्या असून विनाअनुदानित आहेत. त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी संस्थाचालकांची मनमानी सुरु केली आहे.
गतवर्षी सुद्धा असाच प्रकार झाल्याची तक्रार काही पालकांनी केली होती. त्यामुळे यावर्षी गटशिक्षणाधिकारी यांनी पालकांची आर्थीक लूट होवू नये म्हणून शाळांना शालेय साहित्य विक्री, गणवेश व इतर वस्तु विक्री आपल्या संस्थेमधून करण्यात येऊ नये अन्यथा आपल्यावर कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिले होते. या पत्राकडे दुर्लक्ष करीत त्या पत्रला केराची टोपलीत टाकून या संस्था सर्रास विक्री करताना दिसत आहे.
आपल्या मुलामुलींनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावे यासाठी पालकांची अट्टाहास असतो. याच संधीचा फायदा घेत विनाअनुदानीत शिक्षण संस्थाचालक पालकांना पुस्तके, लेटरबूक, गणवेश व इतर शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून घेण्याची सक्ती करतात. यासाठी बाजारभावापेक्षा जादा रक्कम ते पालकांकडून उकळतात. शेगाव शहरातील इंग्रजी शाळांमध्ये असे प्रकार सर्रास सुरु आहेत. यामुळे पालकांची आर्थीक लूट होत असल्याचे दिसून येते.
अशा प्रकारे संस्थाना सदर वस्तुची विक्री करता येत नाही या बाबत शासनाचे धोरणात्मक नियम असताना जर असे निदर्शनास आल्यास संबंधित सस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार असे कडक आदेश शासनाचे आहेत.
असे असल्यावरही शेगाव शहरात अशा संस्था उघडपणे आपल्याच संस्थेच्या कार्यालयातून सदर सहित्याची विक्री करीत आहेत. काही पालकांनी तर या बाबतीत गट शिक्षणाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार ही दिली आहे. या तक्रारीची प्रत शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री, यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
बुलडाणा शिक्षणाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे साहित्याची विक्री संस्थेतून केल्या जावू नये. असे पत्र संस्थाना दिलेले आहे. परंतू हे सर्व प्रकार सर्वच संस्थेमधे सर्रास चालत असतात. मात्र कार्यवाही होताना दिसत नाही. मात्र माझ्याकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मी चौकशी करणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये पुढील कारवाई नक्की करणार आहे. कुणालाही माफ केले जाणार नाही.
- पी.डी. केवट
गट शिक्षणाधिकारी ,शेगाव