लाच घेताना लिपिकाला अटक
By admin | Published: February 13, 2016 02:19 AM2016-02-13T02:19:00+5:302016-02-13T02:19:00+5:30
निरीक्षक दुकाने व संस्था कार्यालयातील घटना.
खामगाव : दुकानाचा परवाना देण्यासाठी ३ हजार २00 रुपयांची लाच मागणार्या खामगाव येथील दुकाने निरीक्षक व संस्थेच्या कार्यालयातील लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारीला दुपारी रंगेहात पकडले. खामगाव येथील कार्यालयात पंचासमक्ष लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने लिपिक शेषराव सुखलाल जाधव यांच्या विरोधात ही कारवाई केली. रतन रामलाल मोरे यांच्या वडिलांचे निधन झाल्याने वडिलोपाजिर्त हार्डवेअर अँन्ड बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचे नाव बदलून, मोरे यांना पत्नी व त्यांच्या नावाने दुकानाचे परवाने हवे होते. मात्र, निरीक्षक दुकाने व संस्थेमधील लिपिक शेषराव सुखलाल जाधव याने दोन्ही परवान्यासाठी प्रत्येकी १६00 रुपये या प्रमाणे ३ हजार २00 रुपयांची लाच रतन मोरे यांच्याकडे मागितली होती. या प्रकरणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर ११ फेब्रुवारी रोजी पडताळणीची कार्यवाही झाली होती. त्यानुषंगाने १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात येऊन खामगाव येथील निरीक्षक दुकाने व संस्था कार्यालयामध्ये ३ हजार २00 रुपयांची लाच स्वीकारताना मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा येथील रहिवासी असलेले शेषराव सुखलाल जाधव (४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी रंगेहात अटक केली. त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख, अपर पोलीस अधीक्षक व्ही.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. भाईक, एएसआय श्याम भांगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नेवरे, पोलीस नायक संजय शेळके, संतोष यादव, चालक दानीश यांनी ही कारवाई केली. लाच मागणार्याची टोलफ्री क्रमांक १0६४ संपर्क साधून माहिती द्यावी, असे एसीबीचे उपअधीक्षक विवेक पाटील यांनी स्पष्ट केले.