पाणी टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:54 PM2019-03-16T14:54:23+5:302019-03-16T14:54:50+5:30

बुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या स्थितीचा राज्यस्तरीय पथकाकडून आढावा घेण्यात येत आहे.

Search of alternative arrangements on water scarcity! | पाणी टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध!

पाणी टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या स्थितीचा राज्यस्तरीय पथकाकडून आढावा घेण्यात येत आहे. शुक्रवारी या पथकाने सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांची पाहणी करून पाणी पुरवठ्याची स्थिती जाणून घेतली. भविष्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता टंचाईच्या दाहकतेवर पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्याला प्रशासनाने आजपासूनच सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झाल्याने संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळाच्या कचाट्यात अडकला आहे. जिल्ह्यातील जलसे्रातांनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील मोठ-मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा खालावला असून, पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय पथक गुरुवारला बुलडाणा येथे दाखल झाले. सुरुवातीला बुलडाणा तालुक्यातील हनवतखेड येथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर शुक्रवारी सिंदखेड राजा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये जाऊन पाणी टंचाईची स्थिती जाणून घेण्यात आली. त्यानंतर या राज्यस्तरीय पथकाने देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन पाणी पुरवठ्याची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली. गावामध्ये पाण्याचे टँकर नियमित येते किंवा नाही, विहीर अधिग्रहण केलेल्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे किंवा नाही, याची माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली. या पथकामध्ये पाणी पुरवठा विभागाचे अवर सचिव प्र. वि. कानडे, मंत्रालयातील कक्षाधिकारी रेगे, एस. जे. तुमराव, आर. एस. पात्रे यांचा समावेश असून, पाहणी दरम्यान जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग व पंचायत समितीमधील अधिकारी हजर होते. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याच्या भीतीने आतापासून विहीर अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे व इतर पर्यायी सुविधांचा मार्ग शोधण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
 
वादग्रस्त खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी
मराठवाड्यात पाणी नेण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील वादग्रस्त ठरलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी पाणी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने शुक्रवारी केली. त्याचबरोबर परिसरातील ग्रामस्थांशी या पथकाने चर्चा करून त्यांच्या पाणी समस्या जाणून घेतल्या. राज्यस्तरीय पथकाने खडकपूर्णा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर सर्वांच्याच नजरा पथकाच्या अहवालाकडे लागल्या आहेत.

Web Title: Search of alternative arrangements on water scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.