अकरावी प्रवेशासाठी सीईटचा विचार, अनेक प्रश्न अनुत्तरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:41+5:302021-05-16T04:33:41+5:30
बुलडाणा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...
बुलडाणा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार शासन करीत आहे. मात्र, परीक्षा नेमकी कशी घ्यायची, असा प्रश्न निर्माण होत आहे.
राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढता संसर्ग पाहता शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंताही आहे. बुलडाणा जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशासाठी ओढाताण होत नसली तरी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालक मेटाकुटीला येतात. अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करीत आहे. यातील गुणांवरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा मानस आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कोरोनाकाळात कशी घ्यायची याचे आव्हान शिक्षण विभागासमाेर आहे. तसेच अकरावीसाठी सर्व विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याने आयाेजन करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावीत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळताे. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतत, आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.
ऑफलाईन झाले तर कोरोनाचे काय?
ऑफलाईन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, त्यात पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही़
ऑनलाईन झाली तर ग्रामीण भागाचे काय?
कोरोनामुळे ऑनलाईन सीईटी घेण्याचा विचार केला तर याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. ग्रामीण भागात नेटवर्क अभावी तसेच अँण्ड्राॅईड मोबाईल अनेक विद्यार्थ्यांकडे नाहीत. यातून परीक्षेला मुकाचे लागण्याची भीती आहे़
अंतर्गत मूल्यमापन कसे हाेणार ?
दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बहुतांश शाळांत झाले नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सूचनाच अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. मार्गदर्शनक सूचना मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य हाेणार आहे़
काेट
अकरावी प्रवेशासाठी सीईटी किचकट ठरणार आहे. ही परीक्षा सर्वच शाखेचे लाखाे विद्यार्थी प्रवेश देणार असल्याने यंत्रणेवर ताण वाढणार आहे. तालुका, शहरापुरती मर्यादित सीइटी परीक्षेचे आयाेजन केले जाऊ शकते. ग्रामीण भागात अशी परीक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे माेठ्या शहरातील महाविद्यालयांनी स्वतंत्रपणे अशा परीक्षांचे आयाेजन करावे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना थेट प्रवेश द्यावा़.
- डाॅ़. निलेश गावंडे, प्राचार्य
सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची सध्याचा काळ बघता गरज नाही. महाविद्यालयांमध्ये जे आधी येतील त्यांना प्रवेश द्यावा. ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांना विद्यार्थीच मिळत नाहीत. तसेच सीईटी परीक्षेचे आयाेजन करणे काेराेना काळात शक्य नाही. माेठ्या महाविद्यालयांनी स्वतंत्रपणे घ्यावी. इतरांना अशी परीक्षा घेण्यासाठी निर्बंध घालू नयेत.
- डाॅ़. ई़. जे. हेलगे, प्राचार्य
अकरावी प्रवेशासाठी सीईटी चांगलीच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून हुशार मुलांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. अशी परीक्षा घेताना १५ दिवस किंवा एक महिना आधी विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात. तसेच दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असावी. अनेक मुलांनी ११वीचा अभ्यास सुरू केला आहे. तर काहींच्या अभ्यासात खंड पडला आहे. त्यामुळे, पूर्वकल्पना देउन परीक्षा घ्यावी.
- शालीग्राम उन्हाळे, प्राचार्य