शेगावात तिहेरी तलाकचा दुसरा, तर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:03 PM2020-12-11T13:03:11+5:302020-12-11T13:05:43+5:30
Triple Talaq . पतीने माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीनवेळा तलाक उच्चार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : चिखली येथील एका महिलेने शेगाव पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने माहेरात येऊन शिवीगाळ करीत तीनवेळा तलाक उच्चार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याचबरोबर सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचेही नमूद केल्याने पोलिसांनी पतीसह तीन जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल केले.
तिहेरी तलाक देणे हा कायद्याने गुन्हा असला तरी, अशा पद्धतीने तोंडी तलाक देण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. चिखली येथील शे.मोहसीन अ.कादर या युवकासोबत शेगाव येथील युवतीचे दीड वर्षांपूर्वी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. अनेकवेळा पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतीसह सासरकडील मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अनैतिक संबंधाला विरोध करीत असल्याने २२ नोव्हेंबर रोजी विवाहितेला बेदम मारहाण करत घरातून हाकलण्यात आले. ७ डिसेंबर रोजी पती, सासू, सासरा व इतर तीन जणांनी शेगावात येऊन मुलीकडील मंडळींना अश्लील शिवीगाळ केली. पती शेख मोहसीन याने तीन तलाक असा उच्चार करत सर्वजण निघून गेले.
याप्रकरणी ८ डिसेंबर रोजी विवाहितेने शेगाव शहर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पती शे. मोहसीन अ. कादर, अ. कादर अ. रज्जाक, मालन बी अ. कादर या तिघांसह इतर तीन जणांविरुद्ध मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत तसेच भादंविच्या विविध कलमान्यये गुन्हे दाखल करण्यात आले. सर्व आरोपी फरार आहेत. पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.