दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:25+5:302021-06-09T04:42:25+5:30

बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन ...

The second lockdown poisoned marital life! | दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष !

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष !

Next

बुलडाणा : लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटुंबच घरामध्ये अडकल्याने दैनंदिन आयुष्याचे गणित बिघडले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. रोजगाराचे साधन हिरावले गेले. या आरोग्य, आर्थिक चिंतेच्या कठीणकाळात काैटुंबिक कलह वाढले. बुलडाणा जिल्ह्यात अशा प्रकरणाची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये भराेसा सेलने समझाैता घडवला आहे.

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने गतवर्षी मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. त्यामुळे अनेकांचा राेजगार हिरावला हाेता. आर्थिक संकटामुळे कुटुंबात कलह वाढले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात पती अतिमद्य सेवन करताे, पती किंवा पत्नीचे अनैतिक संंबंध, सासरकडील मंडळींची संसारात लुडबुड आदी कारणांमुळे वाद हाेतात. काैटुंबिक कलह साेडविण्यासाठी भराेसा सेलची निर्मिती करण्यात आली आहे. या सेलकडे जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये ४४६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १३२ तक्रारींमध्ये समझाैता करण्यात आला आहे. भराेसा सेलच्या वतीने पती व पत्नीचे समुपदेशन करण्यात येते. यासाठी भराेसा सेलच्या प्रमुख एपीआय अलका निकाळजे, एएसआय अलका सरदार, हेडकाॅन्स्टेबल कल्पना गवई, एनपीसी सूर्यकिरण साबळे परिश्रम घेत आहेत.

७२ पती-पत्नीचे साेडवले भांडण

भराेसा सेलकडे सन २०२१मध्ये मे महिन्यापर्यंत एकूण २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये समझाैता घडवण्यात आला आहे. गेल्यावर्षी एकूण ४४६ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १३२ प्रकरणांमध्ये समुपदेशानातून समझाैता घडवण्यात आला आहे. छाेट्या छाेट्या कारणांवरून हाेणारे वाद विकाेपाला जाऊन तक्रारीपर्यंत जात असल्याचे चित्र आहे.

पतीने मद्य प्राशन हेच कारण

भराेसा सेलमध्ये आलेल्या बहुतांश तक्रारींमध्ये पतीचे मद्य प्राशन हे महत्त्वाचे कारण असते. तसेच पती किंवा पत्नीचे अनैतिक संबंध, पत्नीच्या आईची किंवा बहिणीची संसारात लुडबुड करणे, पतीच्या आईवडिलांची लुडबुड आदींमुळे वाद हाेतात तसेच काही वेळा समजून घेण्याची तयारी नसल्याने वाद वाढतच जातात.

लग्नाच्या दहा दिवसातच वाद

लग्न झाल्यानंतर दहा दिवसातच पती-पत्नीमध्ये वाद झाले हाेते. गैरसमजुतीतून हे वाद वाढतच गेल्याने आठ ते दहा महिने ती मुलगी माहेरीच राहिली हाेती. तिला नांदायला नेण्यासाठी पती टाळाटाळ करीत हाेता. भराेसा सेलकडे हे प्रकरण आल्यानंतर दाेघांचेही समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर आता त्यांचा संसार सुरळीत सुरू आहे.

कठोर नियमांमुळे घडले वितुष्ट

भराेसा सेलमध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणामध्ये घरातील शिस्तीमुळे वाद झाला हाेता. घरात वागणुकीसाठी असलेल्या नियमांचे पालन करणे नवविवाहितेला शक्य झाले नाही. त्यामुळे, वाद तक्रारीपर्यंत गेले. भराेसा सेलमधील कर्मचाऱ्यांनी पती व पत्नीचे समुपदेशन केले. त्यानंतर पती व पत्नी यांना आपली चूक लक्षात आली. सध्या दाेघांचा संसार सुरळीत सुरू झाला आहे.

दुसऱ्या लाॅकडाऊनमुळे वाद झाल्याच्या तक्रारी जिल्ह्यामध्ये कमी आहेत. काैटुंबिक वाद हाेण्याची कारणे नेहमीसारखीच आहेत. भराेसा सेलकडे जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत २०७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ७२ प्रकरणांमध्ये समझाैता घडवण्यात आला आहे.

- अलका निकाळजे, भराेसा सेलप्रमुख, बुलडाणा

Web Title: The second lockdown poisoned marital life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.