‘विठ्ठल दर्शन’च्या दुसऱ्या फेरीने भाविक वारीला
By admin | Published: June 30, 2017 12:49 AM2017-06-30T00:49:00+5:302017-06-30T00:49:00+5:30
आषाढी एकादशी यात्रा महोत्सव : तिसरी फेरी १ जुलै, तर शेवटची २ जुलै रोजी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवानिमित्ताने येथून सोडण्यात येणारी ‘विठ्ठल दर्शन’ ची खामगाव ते पंढरपूर रेल्वेची दुसरी फेरी ३० जून रोजी पहाटे ३ वाजता रवाना झाली. या दुसऱ्या फेरीने भाविक पंढरपूरला मार्गस्थ झाले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सव अवघ्या ५ दिवसांवर आला आहे. या आषाढी सोहळ्यानिमित्ताने येथून २८ जून रोजी दुपारी ४ वाजता १२ बोगींच्या पहिल्या फेरीने ४६७ भाविकांनी पंढरीची वारी केली.
दुसरी फेरी २९ जून रोजी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. या दुसऱ्या फेरीची खामगाव येथील रेल्वे स्थानकावरुन सुटण्याची नियोजित वेळ दुपारी ४.२० वाजताची होती. मात्र मुंबई येथून उशिरा कोच पोहोचणार असल्याने ही फेरी तब्बल सहा तास उशिराने खामगाव येथून निघाली. खामगाव रेल्वे स्थानकाला फेरी उशिरा निघणार असल्याचे आधीच कळविण्यात आले. खामगाव रेल्वे स्थानक प्रबंधक संजय भगत यांनी तशा सूचना भाविकांना दिल्या होत्या. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली. मात्र, तरीही अनेक गावातील भाविकांना आपल्या गावातून खामगाव येथे येण्यासाठी रात्री उशिराची बस नसल्याने तसेच रेल्वेमध्ये जागा मिळावी, या हेतून अनेक भाविक दुपारपासूनच खामगाव येथील रेल्वे स्थानकावर हजर झाले होते. दुसऱ्या फेरीने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना दुसऱ्या दिवशीही हरिओम गु्रप व सानंदा मित्र मंडळाच्यावतीने फराळाचे पाकिट वाटप करण्यात आले.
खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसच्या आणखी दोन फेऱ्या पंढरपूरकडे जाणार असून, त्यानंतर परतीच्या देखील फेऱ्या पंढरपूर ते खामगाव राहणार आहेत. परतीच्या फेऱ्या ५ जुलै व शेवटची चौथी फेरी ६ जुलै रोजी पंढरपूर येथून खामगावकडे निघणार आहे.
परतीच्या फेरीची पंढरपूर येथून सुटण्याची वेळ दुपारी ४ वाजताची असून, ही फेरी दुसरे दिवशी सकाळी ८.३० वाजता खामगाव येथे पोहोचणार आहे. उर्वरित दोन फेरींना सुद्धा जनरलच्या बोग्या राहणार आहेत. या एक्स्प्रेसचे तिकीट दर सर्वसाधारण प्रवासी १९५ रुपये, ज्येष्ठ पुरुष १२० रुपये, ज्येष्ठ महिला १०० रुपये तसेच ५ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांसाठी १००, रुपये असे तिकीट दर आहेत.
आणखी दोन फेऱ्या
विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची तिसरी फेरी १ जुलै रोजी दुपारी ४.२० वाजता सुटणार आहे. त्यानंतर चौथी व पंढरपूरकडे जाणारी शेवटची फेरी २ जुलै रोजी खामगाव येथून सुटणार आहे. भाविकांनी या स्पेशल रेल्वे फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टेशन प्रबंधक संजय भगत व मुख्य बुकिंग पर्यवेक्षक गोळे यांनी केले आहे.