एकाच महिन्यांत एकाच दुकानात दुसऱ्यांदा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:27+5:302021-09-15T04:40:27+5:30
मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात केके सिद्दीकी यांच्या मालकीचे देशी दारू दुकान असून, हे दुकान व्यंकटेश गोलापल्ली हे चालवितात. ...
मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजारात केके सिद्दीकी यांच्या मालकीचे देशी दारू दुकान असून, हे दुकान व्यंकटेश गोलापल्ली हे चालवितात. सोमवारी रात्री व्यंकटेश गोलापल्ली यांनी दुकान बंद करून घरी गेले असता रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन वाजताच्या सुमारास दुकानाचा कडीकोयंडा तोडून दुकानातील ३१ बॉक्स सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९१ हजार ३८५ रुपयांचा माल लंपास केला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त करीत पोलिसांना घटनेच्या तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तरी या घटनेचा तपास ठाणेदार जितेंद्र अडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नारायण गीते, सचिन कानाडे हे करीत आहेत.
आधी केली होती रोख रक्कम लंपास विशेष म्हणजे या दुकानात या महिन्यातील ही दुसरी चोरी असून, १० ऑगस्ट रोजी चोरट्यांनी या दुकानाचे टिनपत्रे कापून दुकानातील रोख ५० हजार रुपये लंपास केले होते, त्याचा अद्यापही कोणताही तपास लागला नसल्याने साखरखेडा पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
वीज पुरवठा झाला होता खंडित
मलकापूर पांग्रा येथील वीज पुरवठा १ वाजून १५ मिनिटांनी खंडित झाला होता. तो सकाळी ६ वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला. मात्र. या मधल्या कालावधीत चोरांनी हा वीजपुरवठा तर खंडित केला नव्हता ना? किंवा चोरट्यांनी लाईट गेल्याचा फायदा तर उचलला नसेल? असे अनेक तर्क-वितर्क गावकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहेत.
परिसरात अशा घडल्या आहेत चोरीच्या घटना
मागील २०१९ पासून मलकापूर पांग्रा येथे जबर चोरीचे प्रकार घडले असून, यात अजूनही सुगावा लागला नसल्याची खंत गावकरी व्यक्त करीत आहेत. यामध्ये २६ ऑगस्ट २०१९ रोजी नासिर यांच्या घरी ४४ हजार ७०० रुपयांची चोरी झाली होती. तर १२ एप्रिल २०१९ रोजी किराणा दुकान फोडून ८३ हजार ५०७ रुपयांची चोरी झाली होती. याचसोबत ७ जुलै २०१९ रोजी केके सिद्दीकी यांचे देशी दारुचे दुकाने फोडून १ लाख १९ हजार ९५ रुपयांचा मुद्देमाल चोेरून नेला होता. याचसोबत २४ नोव्हेंबर २०२० रोजीच्या एकाच रात्रीत दोन दुकाने फोडून एका दुकानातून १ लाख ९५ हजार ६०० तर दुसऱ्या दुकानातून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. १४ जुलै २०२० रोजी बसस्थानकावरील ग्राहक सेवा केंद्र व जय पान सेंटर ४० हजार रुपये, १० ऑगस्ट २०२१ रोजी केके सिद्दीकी यांच्या देशी दारू दुकान फोडून रोख ५० हजार रुपयांची चोरी करण्यात आली होती. यामध्ये १४ सप्टेंबरच्या चोरीची भर पडली आहे़