दुसऱ्यावर्षीही वाहन बाजार, सराफा बाजारावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:11+5:302021-05-13T04:35:11+5:30
बुलडाणा : अक्षय तृतीयेच्या सणावर सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाचे सावट असून, वाहन बाजारासह सराफा बाजाराला याचा फटका बसला आहे. त्यामुळे ...
बुलडाणा : अक्षय तृतीयेच्या सणावर सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाचे सावट असून, वाहन बाजारासह सराफा बाजाराला याचा फटका बसला आहे. त्यामुळे सराफा बाजारातील उलाढाल ही जवळपास शुन्यावर आली असून, वाहन बाजारातील उलाढालही ठप्प झाली आहे.
हिंदू धार्मिक आस्थेचा विचार करता, एका वर्षात साधारणत: साडेतीन मुहूर्त महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी अक्षय तृतीया हा एक मुहूर्त महत्त्वाचा आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीसह वाहन खरेदीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका जिल्ह्यातील या व्यवसायांना बसला होता. तसा तो कडक निर्बंधांमुळे यावर्षीही बसला आहे. सराफा बाजारात अक्षय तृतीयेला मलकापूर, खामगाव, चिखली, मेहकरसह बुलडाण्याच्या बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल पूर्वी होत होती. ती गेल्यावर्षी अवघ्या दहा टक्क्यांवर आली होती. आता तर ती शुन्यावरच येऊन ठेपली असल्याचे सराफा व्यावसायिकांनी सांगितले.
दुसरीकडे वाहन बाजारात अक्षय तृतीयेदरम्यान दरवर्षी २४ कोटी ३० लाखांच्या आसपास उलाढाल होत होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्यावर्षी व्यवसाय ठप्प झाला आहे. कामगारांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. होंडा कंपनीच्या ८००, सुझुकीच्या ७००, बजाजच्या ३००पेक्षा अधिक दुचाकी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साधारणत: दरवर्षी जिल्ह्यात विक्री होत होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हे व्यवहारच ठप्प झाले आहेत. चारचाकी वाहनांचीही अशीच स्थिती आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेदरम्यान जिल्ह्यात १०० ते १५० चारचाकी वाहने जिल्ह्यात विक्री होत होती. त्यातून जवळपास ९ कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होत होती. मात्र, गेल्या एक वर्षाचा विचार करता, वाहन विक्री व्यवसायात ६० टक्के घट आली आहे.
--३५० कर्मचाऱ्यांना फटका--
वाहन विक्री व्यवसायामध्ये जिल्ह्यात जवळपास ३५० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न आहे. काही प्रमाणात वाहन विक्री व्यवसाय मधल्या काळात सुरू होता. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न त्यातून मार्गी लावण्यात आला होता. आता मात्र पूर्णच ठप्प पडले आहे. परंतु, या कर्मचाऱ्यांनाही अडचणीच्या काळात सांभाळणे आमचे सामाजिक उत्तरदायित्व आहे, त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, असे येथील व्यावसायिक कमलेश कोठारी यांनी सांगितले. सराफा बाजारातीलही ५०० ते ७०० कारागिरांनाही फटका बसला आहे.
--
वाहन विक्री व्यवसायाला गेल्या एक वर्षात मोठा फटका बसला असून, जवळपास ६० टक्के व्यवहार घटले आहेत. ४० टक्केच व्यवहार होत आहे. व्यवसाय स्टेबल होण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. अक्षय तृतीयेला दरवर्षी २४ कोटी रुपयांच्या आसपास जिल्ह्यात उलाढाल होत होती. त्याला फटका बसला आहे.
(कमलेश कोठारी, दुचाकी विक्री व्यावसायिक)
--
कोरोनामुळे सराफा बाजारही डबघाईस आला आहे. गेल्यावर्षी तरी किमान १० टक्के व्यवसाय झाला होता. मात्र, यंदा तर परिस्थिती अधिकच बिकट असून, आर्थिक उलाढालच ठप्प झाली आहे.
(एस. एस. सराफ, बुलडाणा)