माध्यमिक शाळेची घंटा वाजली, प्राथमिक शाळांची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:16+5:302021-09-16T04:43:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात प्रतिसाद आहे. अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याची प्रतीक्षा आहे.
प्राथमिक शाळा सुरू केल्या तर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी, अद्यापही धोका टळलेला नाही. माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे; परंतु त्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे, जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा कायम आहे़ दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धाेका तज्ज्ञांनी वर्तवला असल्याने मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही, याविषयी संभ्रम आहे़
जिल्ह्यात ४८७ शाळा सुरू
जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ९१९ शाळांपैकी ४८७ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याविषयी अद्यापही आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७५३ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत.
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. परंतु शाळा, वर्गांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने मेंटेनन्स अनुदान दिले असून, त्यातून हा खर्च भागविण्यास सांगितले आहे.
पालकांमध्ये मुलांना पाठवण्याविषयी संभ्रम
प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नाही़ पालकांची संमती, ग्रामपंचायतीचा ठराव, न.प., मनपा यांची संमती असल्यास आणि कोरोनामुक्त परिसर, गाव असल्यास शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना आहेत़ त्यानुसार जिल्ह्यात इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ प्राथमिकच्या शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही याविषयी संभ्रम आहे़
प्राथमिकची मुले घरातच
काेराेना संक्रमणामुळे गत दाेन वर्षांपासून प्राथमिकची मुले घरातच आहेत़ ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे ते केवळ नावापुरतेच ठरत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये प्राथमिक शाळाही सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत़