ऐतिहासिक वस्तुंची सुरक्षा धोक्यात!
By admin | Published: December 24, 2014 12:24 AM2014-12-24T00:24:18+5:302014-12-24T00:24:18+5:30
मातृतीर्थ राजवाडातून पंचधातूच्या तोफेची चोरी, पुरातत्त्व विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर.
अशोक इंगळे / सिंदखेडराजा (बुलडाणा)
राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातून ८५ किलो वजनाची तोफ चोरी गेल्याने मातृतीर्थ राजवाडाही असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे इतर ठिकाणच्याही ऐतिहासिक साहित्याची सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले असून, पुरातत्व विभागाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात अनेक पुरातन वस्तू संग्रहीत आहेत. त्यात आडगावराजा येथील भुईकोट किल्ल्याचे २0 वर्षांपूर्वी उत्खनन केले असता त्या १३ एकर परिसरात पंचधातूच्या काही तोफा, तलवारी, दांडपट्टा, समया, नाणी, भांडी, जाते, दगडी शिल्प यांसह अनेक वस्तु सापडल्या होत्या. त्यापैकी काही वस्तु राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात ठेवलेल्या आहेत. दगडी शिल्प बेवारस स्थितीत ठेवलेले असून, किती शिल्प आहेत, याची नोंद संग्रहालयात नाही.
तलवारी, दांडपट्टा, बंदूक यासह अनेक शस्त्र असूनही त्याची नोंद येथे नाही. दर्शनी भागात दोन पंचधातूंच्या तोफा असून, कमानीत तीन मोठी दगडी जाती, शिल्प ठेवलेले आहेत. त्या दोन तोफांपैकी एक ८५ किलो वजनाची तोफ चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना वस्तु संग्रहालयाचे लिपिक राहुल सरकटे यांच्या लक्षात आली. पुरातन वस्तुंबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने अनभिज्ञता दाखविली. एकूणच वस्तु संग्रहालय किती असुरक्षित आहे, याची प्रचिती या घटनेमुळे आली आहे. राजवाड्याला चारही बाजूंनी १५ फूट उंचीच्या भिंतींची तटबंदी आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व पर्यटन स्थळ व्हावे, अशीही मागणी अनेक वर्षांपासून होत आहे; परंतु पुरातन विभाग फक्त सूचना फलक लावूनच पुरातन वास्तूचे रक्षण करत असल्याचे या घटनेमुळे निष्पन्न झाले आहे. वस्तु संग्रहालयात काय पुरातन वस्तू आहेत, याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला दिलेली नाही.
* २0 वर्षांपूर्वी जिजाऊ मासाहेब यांच्याविषयी जो वादग्रस्त शिलालेख तयार केला होता, तो रात्री १२ वाजता घणाचे वार करुन तोडण्यात आला होता. त्यावेळी राजवाड्याला पोलिसांचा पहारा होता. त्यानंतर पुरातन विभागाने चारही बाजूला भिंती बांधून राजवाड्याचे रक्षण सुरु केले. त्यानंतर कालौघात तेही बंद पडले. आजच्या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
*आंदोलनाचा इशारा
चोरट्यांनाही पोलिसांचे अभय निर्माण होत आहे. त्यामुळे जिजाऊ माँ साहेबांच्या राजवाड्यातील तोफ चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ तपास करण्यात यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा लखोजीराव जाधव घराण्याचे वंशज राजे शिवाजीराव जाधव यांनी दिला आहे.