जगात जे जे घडते ते उघड्या डोळ्यांनी बघा- अतुल पेठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:29 PM2019-05-26T16:29:41+5:302019-05-26T16:30:02+5:30
डोक्यातील मेंदूच्या विवेकी आधारावर समोरच्या गोष्टींचे आकलन केले पाहिजे, असे मत प्रख्यात नाट्यकलावंत अतुल पेठे यांनी बुलडाणा येथे केले.
बुलडाणा: आज आपल्या अवतीभवती जगामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत. त्या आपण उघड्या डोळ्यांनी बघितल्या पाहिजे. सांगोवांगी असणाºया गोष्टींवर विश्वास न ठेवता आपल्या डोक्यातील मेंदूच्या विवेकी आधारावर समोरच्या गोष्टींचे आकलन केले पाहिजे, असे मत प्रख्यात नाट्यकलावंत अतुल पेठे यांनी बुलडाणा येथे केले.
रविवारी बुलडाण्यातील प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या उन्हाळी बालवाचन अभियानातंर्गत व्यक्तीमत्व विकासासाठी विविध कलांची साधना या विषयावर बालकांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ‘किमया’ या वेगळ््या धाटणीच्या एकपात्री नाटकाच्या प्रयोगानिमित्त ते बुलडाण्यात आले होते. अतुल पेठें मुलांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, आज विविध माध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या माहितीचे रुपांतर ज्ञानामध्ये करणे गरजेचे आहे. बालपणापासूनच जे करायचं ते चांगलंच करायचे, ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. चांगला अभ्यास करणे, चांगला व्यायाम करणे, चांगले छंद जोपासणे, चांगले मित्र जोडणे, तसेच चांगलीच साहित्य, कला, आणि संस्कृतीचे जाण आणि भान वृद्धिंगत करणे. यातून माणूस म्हणून आपण खºया अर्थाने घडणार आहोत, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी याप्रसंगी मनमोकळी उत्तरे दिली. याच कार्यक्रमात व्यक्तिमत्व विकासाचे तज्ज्ञ मार्गदर्शक तुषार दोडिया यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना हसत-खेळत आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल सजग राहण्याचे महत्त्व विशद केले. आपण आपल्या रंगरुपाला महत्व न देता आपल्यामधील गुणवत्ता ओळखता आली पाहिजे, असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाला प्रगती वाचनालयाचा उन्हाळी बालवाचन वर्गाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वाचनालयाचे ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड यांनी केले तर नरेंद्र लांजेवार यांनी अतुल पेठे यांचा सविस्तर परिचय करून दिला. दरम्यान यावेळी बालकांसह त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.