बीजोत्पादक शेतकऱ्यांना महाबीजचे ५० टक्केच बियाणे मिळणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:59+5:302021-06-03T04:24:59+5:30
चिखली : खरिपाच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणे मिळण्यासाठी नोंदणी केली आहे; परंतु तालुक्यात मागणीच्या तुलनेत ५० टक्के ...
चिखली : खरिपाच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणे मिळण्यासाठी नोंदणी केली आहे; परंतु तालुक्यात मागणीच्या तुलनेत ५० टक्के बियाणे मिळणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पृष्ठभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी पंदेकृविचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी ‘महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.
सोयाबीन उत्पादनात चिखली तालुका राज्यात अग्रेसर असून चिखली येथे सर्वांत मोठा बियाणे प्रकल्पसुद्धा आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाबीज केंद्रावर बियाण्यांची यापूर्वीच नोंदणी केली आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजनसुद्धा केले आहे. परंतु जिल्ह्यात ५४ टक्के शेतकऱ्यांनाच महाबीजकडून बियाणे मिळू शकते, अशी माहिती मिळाल्याने व चिखली महाबीज केंद्रावर शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत ५० टक्के बियाणेच मिळेल असे सांगितले जात आहे. तथापि कृषी केंद्रावरही महाबीज प्रमाणित बियाण्यांचा साठा कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. वस्तुत: पायाभूत बियाण्यांशेजारी इतर दुसरे कोणत्याही बियाण्यांची पेरणी करता येत नाही. असे असताना मागणीप्रमाणे बियाणे मिळणार नसल्याने यामुळे उर्वरित क्षेत्र पडीक ठेवायचे का? असा प्रश्न सरनाईक यांनी उपस्थित केला आहे़ सोयाबीनच्या पायाभूत बियाण्यांचा कोटा वाढवून देण्यासह ‘महाबीज’कडून प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी व महाबीज जिल्हा व्यवस्थापकांकडे केली आहे.