बिजोत्पादन : बुलडाणा जिल्ह्यात ५४ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 11:08 AM2021-06-02T11:08:37+5:302021-06-02T11:08:44+5:30
Buldhana News : बिजोत्पादनाचे यंदाचे उद्दिष्ट जवळपास १६ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्याला झोडपले आहे. त्याचा फटका बिजोत्पादनात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळे बिजोत्पादनाचे यंदाचे उद्दिष्ट जवळपास १६ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. सोबतच गतवर्षीच्या तुलनेत ५४ टक्के शेतकऱ्यांनाच बिजोत्पादनासाठी बियाणे उपलब्ध होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.
परिणामस्वरुप बुलडाणा येथील महाबीजच्या जिल्हा कार्यालयामध्ये बिजोत्पादक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी १ जून रोजी गर्दी केली होती. गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात ११ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर महाबीजअतंर्गत बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात ५ हजार ६०० शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, २०१९ आणि २०२० या दोन्ही वर्षात परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. त्यामुळे मूग, सोयाबीन, उदीड, तूर आणि कापसाच्या बिजोत्पादन कार्यक्रमास फटका बसून अपेक्षित बियाणे उपलब्ध हाेऊ शकले नाही. अर्थात उत्पादन झाले. मात्र, ते तपासणीमध्ये पास झाले नाही. परिणामस्वरुप ५६ हजार क्विंटल कच्चे बियाणे यंदा कमी उपलब्ध झाले आहे. पीक काढणीच्या काळात परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केल्याने हा फटका बसला आहे.
याचा विपरित परिणाम महाबीजच्या चालू हंगामाच्या उद्दिष्टावर झाला असून, यंदा ९ हजार ७३३ हेक्टरवरच बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये यावर्षी ३ हजार ३२ शेतकऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. यंदा प्रामुख्याने कापूस ५ हेक्टर (सुधारित), ज्यूट १६० हेक्टर, मूग १८४ हेक्टर, सोयाबीन ८ हजार ४४४ हेक्टर, उडीद ७२३ हेक्टर, तुरीचे २१६ हेक्टरवर बिजोत्पादन करण्यात येणार असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. मोराळे यांनी दिली.
६० कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ
बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना चिखली, खामगाव आणि मेहकर येथील बाजार समित्यांमधील महत्तम भावाच्या २० ते २५ टक्के अधिक मोबदला पास केलेल्या बियाण्यावर महाबीज देते. त्यामुळे शेतकरी प्रामुख्याने या बिजोत्पादन कार्यक्रमाकडे वळत आहेत. सरासरी दर हे हमीभावापेक्षा कमी आले तर जो फरक आहे तो शासनाकडून बिजोत्पादकाला देण्यात येतो. त्यामुळेच यावर्षीही महाबीजच्या जिल्हा कार्यालयात बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. सध्या बियाणे वाटपास महाबीजने प्रारंभ केला आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, कामगाव मलकापूर, देऊळगाव राजा येथील महाबीजच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रमासाठी कच्चे बियाणे दिले जात आहे.