बियाण्यांच्या दरात तफावत!

By admin | Published: June 2, 2017 12:28 AM2017-06-02T00:28:27+5:302017-06-02T00:28:27+5:30

शेतकरी अडचणीत : १ लाख १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज

Seed rate difference! | बियाण्यांच्या दरात तफावत!

बियाण्यांच्या दरात तफावत!

Next

ब्रह्मानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. सोयाबीनला सध्या २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, सोयाबीनचे नामांकित कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेले सोयाबीन व नामांकित कपंन्याच्या सोयाबीन बियाण्यात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांचे खत व बियाण्यांचे नियोजन बिघडले आहे.
जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे पीक सर्वाधिक असून, ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांच्या मालाला अत्यल्प भाव असल्याने शेतकरी आपल्याकडे पेरणीच्या खर्चासाठी ठेवलेला माल विकून पेरणीही पूर्ण करू शकत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले. मात्र, सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन घरातच ठेवले. खरीप हंगामाच्या पेरणीच्यावेळी घरातील माल विकायचा व त्यावर पेरणीसाठी लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करून पेरणीचा खर्च भागवायचा, अशी तयारी बहुतांश शेतकऱ्यांची असते; मात्र सध्या सोयाबीनला केवळ २५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत भाव मिळत आहेत, तर नामांकित कंपन्याचे सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्ंिवटल ३६०० ते ४ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनच्या भावात व नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या भावात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले असल्याने खरीप पेरणीच्या नियोजनावर त्याचा परिणाम जाणवत आहे.

१ लाख ३६ हजार क्ंिवटल बियाण्याचे नियोजन
जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील ३८ हजार ५८० आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता!
राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकानी पीक कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. परिणामी खरिपासाठी खत व बियाण्याकरिता पै-पै जुळविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर अर्थचक्र बिघडल्याचा परिणाम झाला असल्याने शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

Web Title: Seed rate difference!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.