स्वस्त धान्याची ३५0 पोती गहू, तांदूळ जप्त
By admin | Published: January 28, 2017 02:33 AM2017-01-28T02:33:18+5:302017-01-28T02:33:18+5:30
पंधरा दिवसातील दुसरी घटना.
शेगाव, दि. २७- तालुक्यातील शिरसगाव निळे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जानेवारी महिन्यातील गावात वितरणासाठी उचल केलेला माल गावात घेऊन न जाता ते शेगाव शहरातील खरेदी-विक्री संस्थेच्या गोडाउनमध्ये खुल्या मॉर्केटमध्ये विक्रीसाठी ठेवल्याचे मिळून आले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
गजानन हरिभाऊ निळे या शिरसगाव निळे येथील स्वस्त धान्य दुकानदाराने जानेवारी महिन्याचे स्वस्त धान्य शासनाच्या गोडाउनमधून उचल करून गावात वितरण न करता ते खुल्या मॉर्केटमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने शेगाव शहरातील खरेदी विक्री संस्थेच्या गोडाउनमध्ये ठेवल्याची माहिती बुधवारी रात्री निवासी नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी शालिग्राम पवार यांना मिळाल्यावरून त्यांनी आपल्या पथकासह गुप्त खबर्याने दाखविलेल्या गोडाउनची माहिती तपासणी केली असता, तेथे २१0 कट्टे गहू वजन १0५ क्विंटल २२ किलो किंमत १ लाख ७२ हजार २५0 रुपये आणि १४0 तांदळाचे कट्टे वजन ७0 क्विंटल किंमत १ लाख २६ हजार ९६0 रुपये असा माल मिळून आला. सदर माल ताब्यात घेऊन याबाबत पुरवठा निरिक्षण अधिकारी शालिग्राम पवार यांनी शेगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून स्वस्त धान्य दुकानदार गजानन हरिभाऊ निळे रा. शिरसगाव निळे यांच्या विरुद्ध कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दखल करण्यात आला आहे.