धाडनजीक पकडलेल्या गांजाचे मूळ ओडिशामध्ये, चालू आर्थिक वर्षातील होती मोठी कारवाई

By निलेश जोशी | Published: December 22, 2023 09:21 PM2023-12-22T21:21:51+5:302023-12-22T21:23:44+5:30

नक्षलग्रस्त ब्रह्मपूरमधून होताे गांजाचा पुरवठा: पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर

seized ganja is from Odisha | धाडनजीक पकडलेल्या गांजाचे मूळ ओडिशामध्ये, चालू आर्थिक वर्षातील होती मोठी कारवाई

धाडनजीक पकडलेल्या गांजाचे मूळ ओडिशामध्ये, चालू आर्थिक वर्षातील होती मोठी कारवाई

बुलढाणा: गेल्या महिन्यात विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर धाडनजीक पकडण्यात आलेल्या चार क्विंटल अर्थात ९२ लाख रुपयांचा गांजा हा ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त ब्रह्मपूर भागातून जिल्ह्यात आणला गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ओडिशामधील या पट्ट्यात फिरून प्रकरणातील पुरवठादार राजू नामक आरोपीचा माग काढण्यात यशस्वी झाल्याचेही माहिती आहे.

परिणामी अल्पावधीत या आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ओडिशा राज्यातील दुर्गम भागातून हा गांजा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच आंध्र प्रदेशमधूनही बुलढाणा जिल्ह्यात गांजा येत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने धाडनजीक म्हसला बुद्रूक येथे ९२ लाख रुपयांच्या गांजासह १ कोटी ४८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. चार क्विंटलपेक्षा अधिक ५९ किलो ऐवढा हा गांजा होता. ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्ह्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने एलसीबी आणि धाड पोलिसांनी म्हसला गावानजीक सापळा रचत डीडी-०१-सी-९१३१ या क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले होते. या प्रकरणात राहुल गोटीराम साबळे (२७ रा. कुऱ्हा, ता. मोताळा) यास ताब्यात घेण्यात आले होते. तर त्याचा एक साथीदार फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एका आरोपीस गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षातील होती मोठी कारवाई
धाडनजीक करण्यात आलेली कारवाई ही चालू आर्थिक वर्षातील मोठी कारवाई होती. त्यामुळे या कारवाईची चर्चा होती. दरम्यान प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे संबंधित वाहनाद्वारे बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या पट्ट्यात गांजाचा पुरवठा करत जात होते, असेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या लगतच्या पट्ट्यातही त्यांचे लागेबांधे असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीनेही सध्या बुलढाणा पोलिस तपास करत आहेत.

Web Title: seized ganja is from Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.