गळा कापणारा मांजा जप्त; दोन विक्रेत्यांवर गुन्हा
By अनिल गवई | Published: January 8, 2024 06:45 PM2024-01-08T18:45:14+5:302024-01-08T18:45:23+5:30
बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाई केली.
खामगाव : बंदी असलेल्या घातक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाई केली. त्यांच्याकडून ११ रील नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ माजली आहे. मकरसंक्रांतीच्या अनुषंगाने शहरात पतंग शौकिनांकडून पतंग उडविल्या जात आहेत. पतंग आणि मांजाला असलेली मागणी लक्षात घेता, खामगाव शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या पथकाने सोमवारी सकाळी दोन पतंग विक्रेत्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार शंभर रुपये किमतीचा ११ रील नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कैलाश घनराज आसेरी (५७, रा. मोची गल्ली) व उतमबंद गोगरीलाल गोयल (६०, रा. आठवडी बाजार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे डीपी पथकाचे हे.कॉ. गजानन बोरसे, ना.पो.का. सागर भगत, पो.कॉ. अंकुश गुरुदेव, महिला पो.कॉ. दिव्या काळे यांनी केली.