गर्भपाताचा औषधी साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:41+5:302021-07-14T04:39:41+5:30
आतापर्यंत कोरोनाच्या उद्रेकामुळे रेमडेसिविर इंजेक्शनसह, आवश्यक अैाषधीसाठा, ऑक्सिजनसाठी पाठपुरावा करण्यात अन्न व अैाषध प्रशासन विभाग व्यस्त होता. त्यातच आता ...
आतापर्यंत कोरोनाच्या उद्रेकामुळे रेमडेसिविर इंजेक्शनसह, आवश्यक अैाषधीसाठा, ऑक्सिजनसाठी पाठपुरावा करण्यात अन्न व अैाषध प्रशासन विभाग व्यस्त होता. त्यातच आता कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात नियंत्रणात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार एफडीएने एमटीपी ड्रग अर्थात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी साठ्याच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यातील २० अैाषध विक्रेते व डॉक्टर्सच्या पेढ्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे. या तपासणीदरम्यान बुलडाण्यातील जांभरूण रोडवरील मे. मनीष मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्समध्ये आक्षेपार्ह पद्धतीने एमटीपी ड्रग अंतर्गत गेसट्रॅप्रो टॅबलेटचा साठा आढळून आला. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या साठ्याच्या खरेदी-विक्रीच्या बिलासंदर्भात सध्या अन्न व औषध प्रशासन विभाग तपास करत आहेत. त्यानंतर यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे एफडीएचे सहायक आयुक्त (औषधे) अशोक बर्डे यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे (औषधे) सह आयुक्त यु. बी. घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक बर्डे, औषध निरीक्षक गजानन घिरके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
--प्रिस्क्रीप्शनशिवाय करू नये--
औषध विक्रेत्यांनी विना प्रिस्क्रीप्शनशिवाय एमटीपी ड्रगची विक्री करू नये तसेच इतर कोणीही एमटीपी ड्रग अवैधरित्या विक्री किंवा साठा करू नये. तसे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अशोक बर्डे यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, १२ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत बुलडाण्यातील मेडिकल स्टोअर्सची झाडाझडती घेण्यात आली होती.