विशेष दूध प्रकल्पाअंतर्गत शेगाव तालुक्यातील १५ गावांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 02:37 PM2018-07-12T14:37:58+5:302018-07-12T14:39:51+5:30
महादूध योजनेअंतर्गत कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार
शेगाव - राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विशेष दूध प्रकल्प (महादूध) च्या माध्यमातून शेगाव तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील माटरगाव बु, माटरगाव खुर्द, मोरगाव डिग्रस, जलंब, जानोरी, पाळोदी, जवळा पळसखेड, तरोडा कसबा, तिंत्रव, आळसणा, शेगाव रूरल, चिंचोली कारफार्मा, गौलखेड, टाकळी विरो व सवर्णा या गावांची निवड करण्यात आली आहे.
महादूध योजनेअंतर्गत कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैरण विकास योजनेअंतर्गत बहुवार्षिक पिकांची लागवड करण्यास प्रोत्साहन देणे व अनुदान देणे, ग्रामपातळीवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, गोचिड, गोमाशा निर्मूलन करणे, वंध्यत्व निवारणार्थ उपाययोजना करणे व रोगप्रतिबंधक लसीकरण करणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम उपरोक्त गावात राबविण्यात येणार आहेत. वैरण विकास योजना प्रभावीपणे अमलात यावी म्हणून प्रत्येक गावात शेतकऱ्यांना प्रशिक्षण संबंधित गावातच आयोजित केले जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रघुनाथ इंगळे (पंचायत समिती शेगाव) यांनी केले आहे.