‘जलयुक्त शिवार’साठी २४५ गावांची निवड
By admin | Published: May 2, 2016 02:26 AM2016-05-02T02:26:52+5:302016-05-02T02:26:52+5:30
बुलडाणा येथे राज्याचा ५६ वा स्थापना दिवस थाटात संपन्न.
बुलडाणा : भूजल पातळी वाढवून मोठय़ा प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी सन २0१६-१७ साठी दुसर्या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांचा ३३७.२0 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर १ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर संबोधित करीत होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेवाणे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यास शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात ८४५ गावांचा पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ५0 गावांमध्ये ५६ टँकरद्वारे, २७५ गावांमध्ये अधिग्रहित ३२१ खासगी विहिरींद्वारे, ९ गावांमध्ये ११ विंधन विहिरींद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. प्रशासनाने विविध उपाययोजनांमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांनी व्यक्त केला.