‘स्वाभीमानी’चे आत्मक्लेष आंदोलन; रविकांत तुपकर यांनी स्वत:ला घेतले जमीनीत गाडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 03:58 PM2020-09-23T15:58:32+5:302020-09-23T15:58:49+5:30
नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
मोताळा: अतिपावसामुळे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना त्वरित मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोताळा तालुक्यातील परडा शिवारात शेतातच स्वत:ला मानेपर्यंत गाडून घेत आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत शेतकºयांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
यंदा अतिपावसामुळे शेतकºयांचे मका, सोयाबीन, मुग, उडीद, कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र प्रत्यक्षात कोठे पंचनामे झाले नाही. नुकसानाचा अंतिम अहवालही अद्याप सादर करण्यात आलेला नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र त्यास कुठलीच मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, ही प्रमुख मागणी घेवून हे आंदोलन २३ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील परडा शिवारात एका शेतात स्वत:ला गळ््यापर्यंत जमिनीत गाडून घेत हे समाधी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समवेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सय्यद वसीम, शेख रफीक शेख करीम आणि दत्ता पाटील या त्यांच्या सहकाºयांनीही त्यांच्या समवेत गळ््या पर्यंत स्वत:ला जमिनीत गाडून घेत हे आंदोलन सुरू केले आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २२१ गावातील दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. शेत पिकांसह, जमीन खरडून गेल्याचेही प्रकार यात झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या वर्षीही खरीप आणि रब्बी पिकांचेही अति पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे गतवर्षीेचे दोन्ही हंगाम हातचे गेले यंदाही खरीपाचा हंगाम हातचा गेल्यात जमा असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
तहसिलदार आंदोलन स्थळी
‘स्वाभीमानी’च्या या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार व्ही. एस. कुमरे आणि बोराखेडीचे ठाणेदार हे आंदोलनस्थळी पोहोचले असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र जो पर्यंत शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आंदोलनाची तिव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आमच्या रक्ताचा नैवेद्य द्यायचा का- तुपकर
शेतकरी नुकसानामुळे त्रस्त आहे. गतवर्षीही अशीच स्थिती होती. यंदाही तिच स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्यासाठी आता आम्ही शेतकºयांनी आमच्याच रक्ताचा नैवेद्य द्यायचा का? असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.