नाफेड खरेदी केंद्रावर आत्मक्लेश आंदोलन
By admin | Published: March 3, 2017 12:24 AM2017-03-03T00:24:25+5:302017-03-03T00:24:25+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी : बारदान्याअभावी रोखलेली खरेदी पूर्ववत करा!
चिखली, दि.२ - गत आठ दिवसांपासून येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पोते (बारदाना) नसल्याचे कारण समोर करून तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक व छळ होत असल्याने येथील खरेदी केंद्रावर तातडीने आवश्यक बारदाना उपलब्ध करून देत खरेदी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत २ मार्च रोजी खरेदी केंद्रावर शेतमालासह उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांसमवेत भर उन्हात तब्बल पाच तास ठिय्या देऊन आत्मक्लेश आंदोलन छेडले होते.
यंदा निसर्गाच्या कृपेने शेतकऱ्यांना तुरीचे बऱ्यापैकी उत्पन्न हाती आले आहे. मात्र, बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल ५ हजार ५० रूपये भावानुसार नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून चिखली येथील नाफेड केंद्रावर तुरीच्या बैलगाड्या, ट्रॅक्टर व इतर वाहनांद्वारे शेतकऱ्यांनी रांगा लावलेल्या आहेत, तर २ मार्च रोजी सुमारे २५००० हजार पोत्यांची आवक झाली आहे. मात्र, या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याचे कारण समोर करून खरेदी मोजमाप बंद आहे. यामुळे शेतकरी वर्गाला आठ ते दहा दिवसांपासून आपल्या तुरीची रखवाली करावी लागत आहे, वारंवार बारदाना पोत्याची मागणी करूनही पोते मिळत नसल्यामुळे नाफेडला पोते उपलब्ध करून खरेदी पूर्वत करण्यात यावी, या मागणीसाठी २ मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांच्यावतीने पाच तास उन्हामध्ये बसून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी व सचिव अजय मिरकड यांनी आंदोलनाकर्त्यांची भेट घेऊन उचित कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगीत करण्यात आले. मात्र ३ मार्च रोजी खरेदी सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, अनिल चव्हाण, भरत जोगदंडे, राम अंभोरे, विजय सुरूशे, बाळू कुटे, सुधाकर सपकाळ व शेतकऱ्यांनी यावेळी दिला.