शेतमालकाचे बनावट आधार बनविणे भाेवले; निबंधकांविद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 05:48 PM2020-11-24T17:48:12+5:302020-11-24T17:48:31+5:30
मलकापूर शहर पोलिसांनी वाघोळा येथील सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शेतमालकाचे बनावट आधार कार्ड तयार करून त्याच्या परस्पर विक्री व खरेदी केल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी वाघोळा येथील सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली. सोमवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले.
वाघोळा शिवारात शेतजमीन असलेल्या निमगाव ता. यावल येथील सुभाष नामदेव सावळे यांनी याबाबतची तक्रार केली. त्यानुसार वाघोळा शिवारातील २५ आर शेतजमीन त्यांना विश्वासात न घेता त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. त्यांच्या गैरहजेरीत जमिनीची विक्री व खरेदी करण्यात आली. त्यासाठी सुमन सावळे, दयाराम सावळे, संगिता कावळकर, गोपाल कावळकर, योगेश बावीसआणे सर्व रा.वाघोळा, जयपाल मोरे रा.हरसोडा, सह दुय्यम निबंधक दिनकर पवार यांनी संगनमत करून संगिता कावळकर हिच्या नावे १७ ऑगस्ट रोजी मलकापूर खरेदी - विक्री कार्यालयात खेरदी करून देण्यात आली. त्यातून १ लाख ८५ हजार रूपयांची फसवणूक केली . याबाबत १८ नोव्हेंबर रोजी सुभाष नामदेव सावळे यांनी तक्रार दिली.
त्यावरून शहर पोलिसांनी सात आरोपी विरोधात विविध कलामान्वये गुन्हा दाखल केला. तसेच त्यापैकी संगिता कावळकर, गोपाल कावळकर, योगेश बाविसआणे व जयपाल मोरे या चौघांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.