पावणे दोन कोटींचा विक्रीकर बुडवला; इंदूर येथून एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:21 PM2018-06-25T14:21:46+5:302018-06-25T14:38:13+5:30
मोताळा : श्रीनाथ ट्रेडिंग कंपनी स्थापन करून कापूस विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून एक कोटी साठ लाख रुपयांचा विक्रीकर बुडवल्या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी इंदूर येथून मुकेश मधुकर सिंगारे यास अटक केली आहे.
मोताळा : श्रीनाथ ट्रेडिंग कंपनी स्थापन करून कापूस विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून एक कोटी साठ लाख रुपयांचा विक्रीकर बुडवल्या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी इंदूर येथून मुकेश मधुकर सिंगारे यास अटक केली आहे. दरम्यान, न्यायालयाने त्याची २८ जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. खामगाव येथील सहायक विक्रीकर आयुक्त किशोर प्रल्हादराव ढोले यांनी १२ जूनला बोराखेडी पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली होती. मुकेश मधुकर सिंगारे, उदयकुमार शुक्ला, शेखर जैन (सर्व रा. इंदूर, मध्यप्रदेश) या तिघांनी खामखेड (ता.मोताळा) येथे कागदोपत्री मे श्रीनाथ ट्रेडिंग कंपनी या नावाने विक्रीकर कार्यालय खामगाव येथे कंपनीची नोंदणी केली होती. सदर कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा कापसाचा व्यवसाय करण्यात आला. परंतु चुकीची विवरणपत्र दाखल करून कमी कर संकलन जाहीर केला होता. खरेदी नोंदीत व्यापार्यांकडून दर्शवून खरेदीवर कराची बनावट आकडेवारी दाखवली. देयकर न भरता २०१० ते २०१३ या आर्थिक वर्षाचा अंकेक्षण अहवाल सादर न करता एक कोटी साठ लाख तीस हजार चारशे दोन रुपयांचा विक्रीकर बुडवून त्यांनी शासनाची फसवणूक केली होती. अशा आशयाच्या तक्रारीवरू बोराखेडी पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल संजय गोरे, बुलडाणा ग्रामीणचे पोलिस हेडकॉन्स्टेबल पवार यांनी आरोपी मुकेश मधुकर सिंगारे याला इंदूर येथे गुरूवारी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची २८ जून पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, इतर दोन आरोपींचा सध्याही बोराखेडी पोलिस शोध घेत आहेत. घटनेचा तपास ठाणेदार अविनाश भामरे हे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)