मुदतबाह्य रासायनिक खतांची विक्री!
By admin | Published: July 7, 2017 12:31 AM2017-07-07T00:31:12+5:302017-07-07T00:31:12+5:30
शेतकरी अडचणीत : दक्षता समितीचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : परिसरातील कृषी कृषी केंद्रावर शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच, शेतकऱ्यांच्या घाईचा फायदा घेत, काही कृषी केंद्र संचालकांकडून रासायनिक खते व कीटकनाशक विक्री केल्या जात असल्याच्या पावतीवर (अंतिम मुदत) बॅच नं. न टाकताच त्या उत्पादनाची विक्री करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मुदतबाह्य रासायनिक खतही शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात असून, या प्रकाराकडे दक्षता पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
शासन नियमानुसार शेतकऱ्यांना कृषी केंद्र संचालकांकडून बी-बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खतांची विक्री करताना उत्पादनाची कंपनी, उत्पादनाचा बॅच नंबर विक्री पावतीवर नमूद करणे बंधनकारक आहे; मात्र संग्रामपूर तालुक्यातील काही कृषी केंद्र विनापावतीचे बी-बियाणे विक्री करीत असून, काही ठिकाणी पावतीवर बॅच नंबर आणि एक्सपायरी डेटही टाकल्या जात नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून, या प्रकाराकडे दक्षता पथकाचे दुर्लक्ष आहे.
असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन
संग्रामपूर : तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी भेट देण्यात आली. यावेळी काही शेतकऱ्यांना पंटर म्हणून पाठविण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी एका दुकानदाराने बिलावर कोणतीही नोंद न करता कृषी साहित्य दिले. कीटकनाशकाच्या ‘एक्सपायरी डेट’चाही उल्लेख या दुकानदाराने बिलावर करण्याचे टाळले, तर काही दुकानदारांनी कृषी साहित्य दिल्यानंतर जीएसटीचा धाक दाखवित शेतकऱ्यांना बिल देण्यास नकार दिला. बिल हवे असल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागणार असल्याचा दमही काही कृषी केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना भरला.
कृषी साहित्याची विक्री करताना उत्पादनाचा बॅच नं आणि एक्सपायरी डेट टाकणे गरजेचे आहे. नियमबाह्य पद्धतीने कृषी साहित्य विक्री होत असल्यास संबधीत कृषी केंद्र संचालकांवर कारवाई केली जाईल.
- सी.पी.उन्द्रे, कृषी अधिकारी पं.स.संग्रामपूर