एकाच बागेची चार वेळा चढ्या भावात विक्री! व्यापारी मालामाल, शेतकऱ्यांना मिळतो अल्प भाव
By विवेक चांदुरकर | Published: August 24, 2023 03:40 PM2023-08-24T15:40:03+5:302023-08-24T15:40:26+5:30
एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.
खामगाव : जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. मात्र, फळप्रक्रिया उद्योग नसून विक्रीसाठी शेतकऱ्यांना संपूर्णत: व्यापाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. व्यापारीच संत्र्याचे दर ठरवत असून, शेतकऱ्यांना नाइलाजाने विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. एकच बाग तीन ते चार व्यापारी एकमेकांना जास्त भावात विकतात. शेतकऱ्यांना मात्र अल्प भावावरच समाधान मानावे लागते.
जिल्ह्यात संत्र्याचे आंबीया व मृग असे दोन बहार घेण्यात येतात. दोन्ही वेळी व्यापारी शेतातील संत्रा खरेदी करतात. जिल्ह्यात मार्केट नसल्याने व्यापारी ठरवतील तेच दर शेतकऱ्यांना द्यावे लागतात. अनेकदा व्यापारी अल्प भावात संत्राची बाग खरेदी करतात. शेतकऱ्यांना एक तृतीयांश रक्कम देतात. त्यानंतर एक महिन्याने जास्त भावात व्यापारी दुसऱ्या शेतकऱ्याला विकतात. अशाप्रकारे एकाच बागेची तीन ते चार वेळा जास्त भावात विक्री करण्यात येते. यामध्ये व्यापारी कोणतेही कष्ट न करता लाखो रूपये कमावतात. शेतकऱ्यांना मात्र वर्षभर मेहनत घेवून भरमसाठ खर्च करून अल्प भाव मिळतो. मृग बहारातील संत्र्याला ७०० ते ८०० रूपये कॅरेटनुसार भाव मिळतो. तर आंबीया बहारातील संत्र्याला ४०० ते ५०० रूपये कॅरेट भाव मिळतो. व्यापारी बाजारानुसार संत्रा फळाच्या दर्जानुसार भाव ठरवतात. मात्र, संत्र्याचा दर्जा व्यापारीच ठरवतात. अनेकदा शेतकऱ्यांना बाजारापेक्षा कमी दरात विक्री करावी लागते. ज्या शेतकऱ्यांकडे कमी फळबागा आहेत, त्यांना जास्त नुकसान सहन करावे लागते.
१० हजार १२५ हेक्टरवर फळबागा
जिल्ह्यात १० हजार १२५ हेक्टरवर फळबागा आहेत. यापैकी ६८८१.४० हेक्टरवर फळधारणा क्षेत्र आहे तर ३२४४.११ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात ४५८२.८६ हेक्टरवर संत्र्याची लागवड केली आहे. यापैकी ३२५९.६० टक्के क्षेत्रावर फळधारणा झालेले क्षेत्र असून, १३२३.२६ हेक्टरवर फळपीक क्षेत्र आहे. जिल्ह्यात एकूण फळबागांपैकी ४५ टक्के क्षेत्रावर संत्रा पिकाची लागवड करण्यात आली आहे. फळबागांमध्ये संत्रा पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते.
संग्रामपूर तालुक्यात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणचे मार्केट खूप मोठे आहे. मृग बहाराच्या वेळी अनेक व्यापारी येवून संत्रा खरेदी करतात. मात्र व्यापारी ठरवतात तेच दर द्यावे लागतात. शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने अल्प भावात विक्री करतात. व्यापारी मात्र लाखो रूपये कमावतात. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सूविधा द्यायला हव्या.
- नारायण इंगळे, सचिव, संत्रा उत्पादक शेतकरी संघटना