मुलांना शाळेत पाठवायचे की नाही ?...पालकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:57 AM2020-11-23T11:57:18+5:302020-11-23T11:57:25+5:30
शाळांकडून पालकांचे हमीमत्र घेण्यात येत असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेल्या शिक्षकांच्या शाळा बंदच राहणार आहेत. दरम्यान, शाळांकडून पालकांचे हमीमत्र घेण्यात येत असल्याने पालकांचा गोंधळ उडाला आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, असा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे.
कोरोना अद्याप संपला नाही; परंतु २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने मुलांच्या आरोग्याची जबाबदारी स्विकारायची कुणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकाचा होकार किंवा नकार याबाबत हमीपत्र घेण्यात येत आहे. जिल्ह्यात पालकांकडून संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. आणखी दोन दिवसात सर्व पालकांच्या समंतीपत्र शाळांकडे प्राप्त होतील. त्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाकडे येणार आहे. त्यामुळे तूर्तास किती पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिली हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पालकांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये, अशा सूचनाच शिक्षण विभागाने शाळेला दिलेल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची भीती आहे. त्यात शिक्षकांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये सुद्धा काही शिक्षक पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही भीती वाढत आहे.
मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्याचा अहवाल येईल. ज्या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आले त्या शाळा बंदच राहणार आहेत.
-किशोर पागोरे,
उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवावे की नाही हाच प्रश्न आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेणेही आवश्यक आहे.
-गजानन पवार,
मेहकर.