बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठवा, अन्यथा वेतन थांबवणार
By संदीप वानखेडे | Published: August 25, 2023 08:21 PM2023-08-25T20:21:08+5:302023-08-25T20:21:25+5:30
शिक्षण विभागाचा खासगी संस्थांना इशारा
बुलढाणा : पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांमध्ये रिक्त असलेल्या जागांची बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे. खासगी संस्था बिंदू नामवलीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर शिक्षण विभागाने वेतन थांबविण्याचा इशारा दिला आहे.
राज्यभरात जिल्हा परिषद आणि खासगी संस्थांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत. त्यासाठी सध्या संचमान्यता आणि बिंदू नामावलीची प्रक्रिया सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात खासगी संस्थांमध्ये अनेक जागा रिक्त असतानाही काही शाळा बिंदू नामावलीचा प्रस्ताव पाठवत नसल्याचे समाेर आले आहे. हीच स्थिती राज्यात आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी खासगी संस्थांना बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
खासगी संस्थांकडून दाखवल्या जातात कमी जागा
राज्यभरात जिल्हा परिषद शाळांसह अनुदानित खासगी शाळांमध्येही शिक्षकांची पदे माेठ्या प्रमाणात रिक्त आहेत. शासनाकडून गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक भरती पूर्ण हाेत नसल्याचे चित्र आहे. त्यातच २०१७ मध्ये शिक्षक अभियाेग्यता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पाच वर्षांनंतर मुलाखतीसाठी बाेलावण्यात येत आहे. आधीच माेठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. त्यामुळे, संस्थाचालकांनी न्यायलयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची आशा संस्थाचालकांना आहे. त्यामुळे संस्थाचालक पूर्ण जागा दाखवत नसल्याचे चित्र आहे.