रखडलेल्या साडीच्या ऑर्डरसाठी पाच रुपये पाठवले अन् ९९ हजार गमावून बसले

By भगवान वानखेडे | Published: March 21, 2023 05:44 PM2023-03-21T17:44:53+5:302023-03-21T17:45:04+5:30

एका प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीने १३०० रुपयांची साडी ऑनलाइन ऑर्डर केली.

Sent five rupees for a stalled saree order and lost 99 thousand | रखडलेल्या साडीच्या ऑर्डरसाठी पाच रुपये पाठवले अन् ९९ हजार गमावून बसले

रखडलेल्या साडीच्या ऑर्डरसाठी पाच रुपये पाठवले अन् ९९ हजार गमावून बसले

googlenewsNext

बुलढाणा -एका प्राथमिक शिक्षकाच्या पत्नीने १३०० रुपयांची साडी ऑनलाइन ऑर्डर केली. काही कारणास्तव ती ऑर्डर स्वीकारता आली नसल्याने रखडली. मात्र, हीच संधी सायबर भामट्यांने साधून रखडलेल्या साडीच्या ऑर्डरसाठी लिंकवर पाच रुपये पाठविण्याचे सांगितले आणि ९९ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळती करुन घेतले. याप्रकरणी तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील डीइएस हायस्कुलमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत असलेले अमोल रविंद्र महाजन (३६) यांच्या पत्नीने १२ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने १३०० रुपये किंमतीची साडी ऑर्डर केली होती. २४ फेब्रुवारी रोजी तक्रारदार महाजन पती-पत्नी घरी नसल्याने आलेली डिलीव्हरी स्वीकारता आली नाही. मात्र, ही संधी सायबर भामट्याने साधून १ मार्च रोजी तक्रारदार शिक्षकाच्या पत्नीस फोन करुन ‘तुमची ऑर्डर रखडलेली आहे, ती मिळविण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर पाच रुपये पाठवा असे सांगितले. त्या लिंकवर पाच रुपये पाठविले असता सायबर भामट्याने तब्बल तीन वेळा पेमेंट करण्यास सांगितले.

याप्रकरणी तक्रारदार महाजन यांना संशय येताच त्यांनी ४ मार्च रोजी खात्यातील रक्कम तपासली असता त्यांच्या खात्यातून ९८ हजार ९९९ रुपये आणि दुसऱ्या वेळी ९९९ रुपये असे ९९ हजार ९९८ रुपये एचडीएफसी बॅंकेच्या खात्यात वळती केले असल्याचे दिसून आले. तेव्हा सायबर भामट्याने प्राथमिक शिक्षक अमोल महाजन यांची ९८ हजार ९९८ रुपयाने फसवणूक केली आहे. अशा तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भामट्यांचा एकच फंडा लिंकवर क्लिक करा पैसे पाठवा

जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत असलेल्या फसवणुकीच्या घटनांचा आढावा घेतला असता सायबर भामटे हे सर्वाधिक फसवणूक ही ऑनलाइन ऑर्डर केलेल्या व्यक्तींची करीत आहेत. सोबतच सायबर भामट्यांच्या रडारवर सुशिक्षित अधिक असून, एसबीआय बॅंकेतील खाते सर्वाधिक टार्गेट केले जात आहेत.

Web Title: Sent five rupees for a stalled saree order and lost 99 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.