मारहाणप्रकरणी दोघांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:55 PM2020-03-13T12:55:05+5:302020-03-13T12:55:14+5:30
तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपीस बुलडाणान्यायालयाने तीन महिने सक्त मजुरी व १०० रुपये दंडाची शिक्षा १२ मार्च रोजी सुनावली आहे. तालुक्यातील येळगाव येथे १६ डिसेंबर २०१९ रोजी मारहाणीची घटना घडली होती.
तालुक्यातील येळगाव येथील उषा दिलीप झिने १६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता शेतातून शेळ्या परत घेवून आल्या. दरम्यान, या शेळीतील एक शेळी रमेश रोहीदास गुळवे यांच्या दारात गेली असता त्याने उषा झिने हीस शिवीगाळ केली व शेळीला काठी मारली. उषाने रमेश यास शिवीगाळ करून शेळीला काठी का मारली विचारले असता आरोपी प्रकाश रोहीदास गुळवे याने उषाच्या डोक्यात काठी मारून जखमी केले. नीलेश दिलीप झिने हा सोडविण्यास आला असता आरोपी रमेश गुळवे यांने नीलेशला मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी उषा झिने यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी रमेश गुळवे व प्रकाश गुळवे यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यावरून मुख्य न्यायदंडाधिकारी बुलडाणा यांचेसमक्ष फौजदारी खटला चालविण्यात आला. ज्यात अभियोग पक्षाद्वारे फियार्दी, जखमी साक्षीदार व इतर साक्षीदारांच्या पुराव्याच्या आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी ना.रा. तळेकर यांनी आरोपी प्रकाश गुळवे व रमेश गुळवे यांना दोषी धरून तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिलकुमार वर्मा यांनी कामकाज पाहिले. तपास अधिकारी हवालदार अशोक गाढवे, किशोर कांबळे, ना.पो.कॉ गजानन मांटे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)