गावगावांत विलगीकरण कक्ष स्थापन हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:38+5:302021-05-03T04:28:38+5:30
मेहकर : कोरोनाचा ग्रामीण भागात फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता गावामध्येच आता विलगीकरण कक्ष ...
मेहकर : कोरोनाचा ग्रामीण भागात फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता गावामध्येच आता विलगीकरण कक्ष स्थापन करणे आणि लसीकरण सर्व्हे करण्याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे आदेश काढले आहेत. तसेच विविध समित्यांची स्थापना करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत़
सद्यस्थितीत कोविड बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दवाखान्यामध्ये बेड अपुरे पडत आहेत. गावपातळीवरील कोविड बाधित रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहेत .त्यामधील अधिकाधिक लक्षणे दिसून येत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णांना होम आयसोलेशन होण्याकरता वैद्यकीय यंत्रणेकडून निर्देशीत करण्यात येते. परंतु, सदर रुग्ण हे गावात मुक्त संचार करीत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत़ या रुग्णांना गावात पुरेशी जागा असलेल्या समाजमंदिर ,शाळा, मंगल कार्यालय इत्यादीमध्ये विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तसेच शंभर टक्के लसीकरण व तपासणी यासंबंधी अंमलबजावणी व संनियंत्रण करण्याकरिता मेहकर तालुकाकरिता पाच नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीने गावस्तरीय समितीकडून कामकाज करून घ्यावेत. गावस्तरीय समितीने पूर्णवेळ उपस्थित राहून कामकाज करावे. गावस्तरीय समितीमध्ये आरोग्यसेवक नोडल अधिकारी असून समिती सदस्य म्हणून तलाठी, शिक्षक, ग्रामविकास अधिकारी ,ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, मदतनीस ,आशा ,आरोग्यसेविका व कोतवाल हे काम पाहणार आहेत. या समितीद्वारे गावपातळीवरील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक ,तलाठी, शिक्षक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडीसेविका यांची समिती स्थापन करुन समितीद्वारे गावातील कोविड रुग्णांना आयसोलेशन करून घेण्याकरिता विलगीकरण कक्षाची उभारणी करून देणे, विलगीकरण कक्षातील रुग्णांचे आशा मार्फत दैनंदिन तापमान ,ऑक्सिजन लेवल तपासणी करतील व त्याद्वारे गंभीर रुग्ण आवश्यकतेनुसार संबंधित सेंटरमध्ये हलवण्याबाबत उचित कारवाई करतील. गावस्तरीय समितीचे सर्व सदस्य यांना विभागून दिले सर्व कामकाज पाहतील, अशा प्रकारचे आदेश तहसीलदार डॉ. संजय गरकल व गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी काढले आहेत़ या समितीने केलेल्या कारवाईचा नियमित अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवावा. यामध्ये कोणी दिरंगाई केल्यास त्यांच्यावर साथरोग अधिनियम १८९७ नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत.
तालुकास्तरीय समित्या स्थापन
तालुकास्तरीय विभागनिहाय समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये पंचायत समितीचे साहाय्यक गटविकास अधिकारी जी. एस.पाटोळे ,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एन. जी. घनतोडे, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र सरपाते, गटशिक्षणाधिकारी एम. एस .वानखेडे, मंडळ अधिकारी जी .के. डोके यांचा समावेश असून गावस्तरीय समितीमध्ये आपापल्या विभागाकडून कामकाज करून घेण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीतील संबंधित विभागाचे अधिकारी यांची राहणार आहे.