‘सर्पमित्र’मुळे अनेकांना दिलासा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:43 AM2017-07-27T01:43:27+5:302017-07-27T01:43:30+5:30
खामगाव : साप दिसल्यास त्याला न मारता त्याची माहिती जाणून घ्यावी व साप दिसल्यास त्याला जीवदान देण्यासाठी सर्पमित्रांच्या मोबाइल क्रमांकासह इत्थंभूत माहिती असलेले ‘सर्पमित्र अॅप’ विकसित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : साप दिसल्यास त्याला न मारता त्याची माहिती जाणून घ्यावी व साप दिसल्यास त्याला जीवदान देण्यासाठी सर्पमित्रांच्या मोबाइल क्रमांकासह इत्थंभूत माहिती असलेले ‘सर्पमित्र अॅप’ विकसित करण्यात आले आहे.
या अॅपमध्ये राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यातील सुमारे अडीच हजार सर्पमित्रांचे मोबाइल क्रमांक समाविष्ट करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या अॅन्ड्राइड मोबाइलमधील गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन सर्पमित्र अॅप टाइप करून सदर अॅप इन्स्टॉल करावे व नवीन युजर बनावे. या अॅपमध्ये राज्यातील ३५ जिल्ह्यांतील सुमारे अडीच हजार सर्पमित्रांचे मोबाइल क्रमांक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असून, खामगाव शहरातील १८ सर्पमित्रांच्या क्रमांकाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. याचबरोबर अॅपमध्ये सर्पदंशानंतर रुग्णास जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णालयांची माहितीही देण्यात आली आहे. तसेच वन विभागाचेही उपक्रम आणि वन्य जीवबाबतची माहितीही या अॅपमुळे नागरिकांना मिळणार आहे.
खामगावातील १८ सर्प मित्रांचा अॅपमध्ये समावेश!
राज्यातील अडीच हजार सर्प मित्रांचा समावेश असलेल्या या अॅपमध्ये खामगाव शहरातील १८ सर्पमित्रांच्या क्रमांकाचाही समावेश आहे. या सर्पमित्र अॅपमध्ये विषारी व बिनविषारी सापांच्या सर्व प्रजातींची माहिती नमूद करण्यात आलेली आहे. याचबरोबर साप निघाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबतही माहिती नमूद केलेली आहे. तसेच सापांना पकडण्यासाठी या अॅपमध्ये सुमारे अडीच हजार सर्पमित्रांचे नावासह मोबाइल क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिकांना साप दिल्यास त्यांच्या जवळपासच्या सर्पमित्रांना संपर्क साधणे सोईस्कर होणार आहे.
घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी साप आढळून आल्यास नागरिकांनी प्रथम वन विभाग कार्यालयात संपर्क करावा. नागरिकांनी सर्पमित्र अॅपचा उपयोग करून सापांबद्दल माहिती जाणून घ्यावी.
- सोळंके, वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव.