पुरातत्व विभागाकडून होत असलेल्या उत्खननात प्रगटले शेषशायी भगवान
By निलेश जोशी | Published: June 19, 2024 08:35 PM2024-06-19T20:35:05+5:302024-06-19T20:35:32+5:30
काळ्या पाषाणातील आकर्षक मूर्ती अकराव्या शतकातील असण्याची शक्यता; मूर्ती पूर्ण बाहेर काढण्यासाठी लागणार अजून चार दिवस
सिंदखेडराजा : या शहरात इतिहास आणि पौराणिक काळाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू उपलब्ध आहेत. मात्र, या पलीकडे जाऊन या शहराचे खरे वैभव काय असेल याची साक्ष देणाऱ्या अनेक मूर्ती येथे सुरू असलेल्या उत्खननात मिळून येत आहेत. साधारण एक महिन्यापूर्वी येथे शिवलिंगासह अख्खे शिवमंदिर निदर्शनास आले आहे. तर आता सुरू असलेल्या उत्खननात शेषनागावरील विश्राम अवस्थेतील विष्णू मूर्ती सापडली आहे.
घुमट अर्थात राजे लखुजीराव जाधव यांची सर्वांत मोठी दगडी बांधकाम असलेली समाधी येथे सोळाशेच्या शतकात बांधली गेली. याच समाधी परिसरात सध्या केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन सुरू आहे. समाधी परिसराची दुरुस्ती व्हावी या दृष्टीने हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, याच उत्खननात मागील महिन्यात शिवलिंग आढळून आले. त्यानंतर येथे सुरू असलेले उत्खनन अधिक गांभीर्याने केले जात आहे. या कामात शिवलिंग मिळालेला परिसर खोदण्यात आल्यानंतर संपूर्ण शिवमंदिराचा ढाचा येथे आढळला आहे.
शिवमंदिराशेजारी आढळली विष्णूची सुबक मूर्ती
शिवमंदिर पायापर्यंत खोदण्यात आल्यानंतर चार दिवसांपूर्वी येथे अत्यंत रेखीव कलाकुसर असलेली शेषनाग भगवंताची विश्राम अवस्थेतील मूर्ती, पायाजवळ सेवारत लक्ष्मी अशी ही मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती आढळून आल्यानंतर केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे नागपूर येथील वरिष्ठ अधिकारी मलिक यांनी आपल्या पथकासह येथे भेट देऊन स्वतः मूर्ती काढण्यासाठी काम केले. सोबत असलेल्या तज्ज्ञांना मूर्ती काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.
सध्या ही मूर्ती पायापासून पोटापर्यंत मातीच्या बाहेर दिसत आहे अत्यंत काळजीने ही मूर्ती काढली जात असून पुढील चार ते पाच दिवसांत मूर्ती मातीतून पूर्णपणे मोकळी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे अधिक्षक भारतीय पुरात्त्वविद अरुण मलिक, सहायक शिल्पा दामगडे, शाम बोरकर, शाहिद अख्तर, दीपक सुरा यांच्यासह कामगार, स्थानिक कर्मचारी उपस्थित होते.
उत्खनन अभियान राबविण्याची गरज
सिंदखेडराजा अर्थात पौराणिक काळातील सिद्धखेड येथे राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला आणि ही भूमी प्रेरणा स्थान म्हणून ओळखली जाऊ लागली. राजे लखुजीराव जाधव यांच्या वास्तव्यापूर्वी येथे पौराणिक काळाचा महिमा सांगितला जातो. त्यामुळे या शहरातील अनेक वास्तू परिसरात उत्खनन अभियानाची गरज आहे.