सभापती व प्रशासनाच्या पुढाकाराने निघाला तोडगा
By Admin | Published: January 23, 2016 02:08 AM2016-01-23T02:08:53+5:302016-01-23T02:08:53+5:30
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वपदावर आल्याने शेतकर्यांना दिलासा मिळला.
चिखली : आर्थिक चणचणीचे कारण पुढे करून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार बाजार समिती प्रशासनाच्या आदेशावरून चार दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. शेतकर्यांची प्रचंड गैरसोय पाहता अखेर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, अडते, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यामध्ये झालेल्या समन्वय बैठकीमध्ये या समस्येवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे २२ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्वपदावर आल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक बाजार समितीमधील अडत्यांनी खरेदीदारांकडे व्यवहारांच्या रकमा अडकल्याने बाजारातील व्यवहार करण्यास असर्मथता दर्शविल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार सोमवार १८ जानेवारीपासून पूर्णपणे ठप्प होते. बाजार समितीनेही पुढील आदेशापर्यंंत शेतकर्यांनी शेतमाल विक्रीस आणू नये, असे कार्यक्षेत्रातील शेतकर्यांच्या हितासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी जाहीर केले होते. बाजार समितीने अडते आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहारासंदर्भातील वाद समन्वयाने मिटावा आणि बाजार पूर्ववत सुरू व्हावा, यासाठी गेल्या चार दिवसांपासून बरीच खलबते चालविली होती. परंतु दोन्ही घटक आपापल्या भूमिकांबाबत ठाम असल्याने या प्रकरणावर पडदा पडत नव्हता. अखेर बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी व्यापारी आणि खरेदीदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करुन सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या हितासाठी सर्वांंनी आपापल्या भूमिकेमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा सल्ला सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांनी व्यक्त केला. सुमारे दोन तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेत शेतकरी हितासाठी समन्वयाने तोडगा काढण्यात निघाल्याने २२ जानेवारीपासून बाजार पूर्णपणे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील कुळसुंदर, माजी प्रशासक दिनदयाल वाधवाणी, संचालक काशिनाथआप्पा बोंद्रे, मनोज खेडेकर, रूपराव सावळे, धनंजय पवार, प्रेमराज भाला, बाळू वराडे, सुधीर पडघान, अडते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सचिव पवन अग्रवाल, गोविंद कोठारी यांच्यासह समितीचे सचिव अजय मिरकड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.