दोन मोठ्या गुन्ह्यांसह सात घटनांचा पोलिसांकडून छडा
By अनिल गवई | Published: June 25, 2023 08:03 PM2023-06-25T20:03:46+5:302023-06-25T20:03:53+5:30
शहर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाची यशस्वी कामगिरी
खामगाव: शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी सांघिक पद्धतीने काम करीत दोन मोठ्या घटनांचा अल्पावधीतच छडा लावला. याबाबत शहर परिसरातील इतर पाच घटनांमध्ये आरोपी अटक करण्यात आले. काही गुन्ह्यात मुद्देमाल जप्त केला. खामगाव उपविभागातील पोलिसांची कामगिरी समाधानकारक असून आगामी काळातही पोलिसांची चमकदार कामगिरी दिसेल, असा विश्वास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांनी रविवारी दिला.
खामगाव शहर आणि शिवाजी नगर पोलिसांच्या संयुक्त कामगिरीबद्दल माहिती देण्यासाठी रविवारी सकाळी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. खामगाव शहर आणि उपविभागातील काही आरोपींचा डेटा तयार केला जात आहे. याद्वारे गुन्ह्याचा छडा लावण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणाले. या पत्र परिषदेला शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक अरूण परदेशी उपस्थित होते.
या गुन्ह्याचा लावला छडा...
शिवाजी फैल खामगाव येथील कृषी केंद्राचे गोदाम फोडणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून ९ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याचप्रमाणे शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील ९ लाखांच्या लुटमारीप्रकरणी डीबी पथकाने यशस्वी छडा लावला. याशिवाय सराफा बाजारातील चोरी, खामगाव बसस्थानक, बाळापूर फैलातील शाळा, कृषी उत्पन्न बाजार समितीतील चोरीचाही यशस्वी तपास दोन्ही डी. बी. पथकाने केल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.