एकाच कुटुंबातील सात जणांनी केली काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:38+5:302021-04-29T04:26:38+5:30
काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिवरा आश्रम येथील दळवी कुटुंबातील सात जणांनी काेराेनावर यशस्वी ...
काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिवरा आश्रम येथील दळवी कुटुंबातील सात जणांनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. काेराेनाला घाबरू नये, तर काळजी घ्यावी, असे आवाहन दळवी कुटुंबाने केले आहे़
दळवी कुटुंबात कोरोनाने ३ एप्रिल, २०२१ला शिरकाव केलाच. एक नाही दोन नाही, तर तब्बल सात जण कोरोना पॅाझिटिव्ह आले. या कुटुंबातील सदस्यांच्या पायखालची मातीच सरकली. सुरुवातीला काय करावे, तेच कळत नव्हते. घरात आई, बाबा वयस्कर, लहान ११ महिन्यांचे बाळ असं असताना एकदम सगळेच पॅाझिटिव्ह. डॉक्टर नरेंद्र फिस्के यांनी धीर देउन उपचार सुरू केले. मित्र आत्मानंद थोरहाते यांनीही आधार दिला, आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी काेराेनामुळे काहीही हाेत नाही, काळजी घ्या असा धीर दिला. या आजारातून माणूस १०० टक्के बरा होतो. फक्त त्याला पाहिजेत वेळेवर उपचार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांचा आधाराचा. नातेवाईक मित्रांचा ॲाक्सिजन कृत्रिम ॲाक्सिजनपेक्षा १०० टक्के काम करतो. आई, पत्नी मुलगा, मुलगी, भाऊ, त्याची पत्नी आणि मी असे सात जण पॅाझिटिव्ह होतो. पु.महाराजश्रींच्या कृपाआशीर्वादाने व डॉक्टारांच्या योग्य ट्रिटमेंट व मित्रांच्या नातेवाइकांच्या आधाराने सर्व सुखरूप आहोत. दळवी कुटुंबातील सदस्य शांताबाई दळवी, आत्माराम दळवी, सविता दळवी, श्रीकृष्ण दळवी, उमा दळवी, ज्ञानेश्वरी दळवी, ओम दळवी यांनी काेराेनावर यशस्वी मात केली.
घाबरून न जाता एकही लक्षण जाणवलं की, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणताही आजार अंगावर काढू नका. वेळेवर योग्य ती खबरदारी घेतली की, कोरोना १०० टक्के बरा होतो आणि ज्यांना कोरोना झालाय, त्यांना धीर द्या, त्यांचा तिरस्कार करू नका. शासनाने ज्या सूचना दिल्यात, त्यांचे तंतोतंत पालन करा. परत एकदा सांगतो, या आजारातून बरं होण्यासाठी आधाराची व योग्य मार्गदर्शनाची खूप गरज आहे.
शांताबाई दळवी,
स्वतः कोरोना पॉझिटिव्ह आल्यास न लपविता इतरांना स्वतःपासून दूर ठेवा. तेव्हाच कोरोनाचा संसर्ग आपल्याया रोखता येईल. यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.
आत्माराम दळवी
कोरोणा चाचणी केल्यावर पॉझिटिव्ह रिपाेर्ट आल्यास न घाबरता धैर्याने सामोरे जायचे. कुटुंबातील इतर सदस्यांना मानसिक आधार देत, उपचार सुरू करायचे.
श्रीकृष्ण दळवी, हिवरा आश्रम.
काेराेना पाॅझिटिव्ह आल्यानंतर मानसिक आधाराची गरज असते. काेराेनाची अनेकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे मित्रपरिवार किंवा कुटुंबातील कुणाचाही अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास, त्यांना धीर द्या. काेराेना आजार शंभर टक्के बरा हाेता.
श्रीकृष्ण दळवी
काेराेना संसर्गजन्य आजार असल्याने, ताे इतरांना हाेउ नये, यासाठी काळजी घ्यावी. काेराेना पाॅझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना मानसिक आधाराची गरज असते. आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांनाही आधार दिला. त्यामुळे काेराेनावर यशस्वी मात केली.
सविता दळवी