गतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये सात टक्के अधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:05 PM2020-07-04T12:05:44+5:302020-07-04T12:05:49+5:30
गत वर्षीच्या तुलनेत सात टक्के अधिक पाऊस जून महिन्यात जिल्ह्यात पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जून महिन्यात वाढले असल्याचे निदर्शनास आले असून गत वर्षीच्या तुलनेत सात टक्के अधिक पाऊस जून महिन्यात जिल्ह्यात पडला आहे.
जून महिन्याच्या प्रारंभीच अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्री वादळामुळे मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात पडला. त्यामुळे हे प्रमाण वाढले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक ७६१.६ मिमी पाऊस पडतो. पैकी जून महिन्यात गेल्या वर्षी १३० मिमी पाऊस पडला होता. त्या तुलनेत २०२० मधील जून महिन्यात १८३.१ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस २४.४३ टक्के आहे.
दरम्यान, महिनानिहाय विचार करता यंदा जून महिन्यात गत वर्षीच्या तुलनेत सात टक्के अधिक पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी सरासरी अवघा १७ टक्के पाऊस जून महिन्यात पडला होता. तर यंदा २४.४३ टक्के पडला आहे. दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील नोंदीनुसार जून महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात ११५.७ मिमी पावसाची नोंद होत असते, असे नमूद आहे.
गेल्या दहा वर्षाच्या आकडेवारीचा हा आधार घेत हे मुल्यमापन केलेले आहे. त्या तुलनेत सध्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही सध्याच्या स्थितीला ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून जिल्ह्यात तुर्तास कोठेही पाणीटंचाई नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात ७० टक्क्यांच्या आसपास पेरण्या झाल्याचा अंदाज आहे. मात्र प्रारंभी पडणाऱ्या पावसाने मधल काळात दडी मारली होती. जवळपास १३ दिवसानंतर जिल्यात जून महिन्यात पावसाचे पुनरागमन झाले होते. सध्याही जिल्ह्यात दमदार पावसाची गरज आहे. अपवाद वगळता केवळ तीन सार्वत्रिक स्वरुपाचे पाऊस जिल्ह्यात झाले आहे. त्यातही प्रामुख्याने मलकापूर, जळगाव जामोद तालुक्यातील पावसाची जून महिन्याची सरासरी ही चांगली आहे. जुलै महिन्यात अद्याप अपेक्षीत पाऊस पडलेला नाही.