सात प्रकल्प तुडूंब; बुलडाणा जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:11 PM2019-09-30T14:11:12+5:302019-09-30T14:11:18+5:30
पाणीटंचाईची जिल्ह्यातील समस्या निकाली निघाली असून पाणीपुरवठा योजना असलेल्या उद्भवांना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३.५ मिमी पाऊस जास्त झाला असून, जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या १० प्रकल्पापैकी सात प्रकल्प तुडूंब भरले असून याप्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची जिल्ह्यातील समस्या निकाली निघाली असून पाणीपुरवठा योजना असलेल्या उद्भवांना बऱ्यापैकी पाणी उपलब्ध झाले आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर या पाच तालुक्यात अद्यापही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात चिखली तालुक्यात तुलनेने बरा पाऊस आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मोठे व मध्यमप्रकल्प समाधानकारक भरल्याने भविष्यातील पाणीटंचाईची समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. आॅक्टोबर अखेर पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत उन्हाळ््यासाठी पिण्याचे पाणी आरक्षीत करण्याची समस्या निकाली निघल्यास जमा झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे उद्भवामध्येच पाणी नसल्याने २९ पेक्षा अधिक पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीच आरक्षीत करण्यात अडचण आली होती. ती स्थिती यंदा मात्र नाही. कोराडी आणि नळगगा हे दोन प्रकल्प जर सोडले तर बाकी प्रकल्प हे सध्या तुडूंब भरले असून या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्गही करण्यात येत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. मात्र सप्टेंबर संपण्याच्या एक दिवस अगोदरच बुलडाणा जिल्ह्याने पावसाची सरासरी ओलांडली असून वार्षिक सरासरीच्या १०२ टक्के पाऊस अर्थात ६८१.५ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत तो १३.७ मिमीने अधिक आहे.