सात गावात हायड्रोकार्बन शोधाच्या दृष्टीने प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:45 AM2017-11-23T00:45:57+5:302017-11-23T00:52:40+5:30
हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून, तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्यादृष्टीने प्रयत्न होणार आहे. २0२२ पर्यंत कच्चा तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : हायड्रोकार्बनच्या शोधाच्या दृष्टीने लोणार तालुक्यात लवकरच सर्व्हे सुरू होत असून, तालुक्यातील जवळपास आठ गावांच्या शेतशिवारामध्ये त्यादृष्टीने प्रयत्न होणार आहे. २0२२ पर्यंत कच्चा तेलाची देशात दहा टक्के आयात कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न आहे. त्याचा एक भाग म्हणून हायड्रोकार्बन मिळण्याच्या संभाव्यतेबाबत कृष्णा-गोदावरी खोर्यात सध्या शोध घेण्यात येत आहे.
लोणार तालुक्यातील येवती, बिबखेड, तांबोळा, हत्ता, हिवराखंड, ब्राम्हणचिकना, खा परखेड, महारचिकना, खळेगाव ही गावे यासाठी निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे. महसूल आणि वन विभागाचे उपसचिव यांनी यासंदर्भात लोणार तहसील कार्यालयाला याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्यामध्ये हायड्रोकार्बन साठय़ांची शक्यता तपासण्याच्या दृष्टीने हा सेस्मीक सर्व्हे (हायड्रोकार्बनचा शोध घेण्यासंदर्भातील प्रक्रिया) करण्यात येत आहे. तेल व नैसर्गिक वायू महामंडळातंर्गत हे काम होत आहे. लोणार तालुक्यातील जमिनीखाली पेट्रोलियम पदार्थांचे साठे सापडू शकतात. त्या दृष्टिकोनातून या जमिनीखालील खडकांचे नमुने गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.
७0 टक्के तेलाची आयात
देशात ७0 टक्के खनिज तेलाची आयात आजघडीला केली जाते. २0२२ पर्यंत यामध्ये दहा टक्क्यांनी घट करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुषंगाने देशातील ज्या भागात यापूर्वी असे सर्व्हे झाले नाहीत, त्या भागात त्याचा शोध घेऊन देशांतर्गत तेलसाठे शोधण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचाच हा एक भाग आहे. सोबतच स्वच्छ इंधनाचे स्रोत म्हणून नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सिमेंट, खत, स्टील उद्योगात इंधन म्हणून नैसर्गिक वायूचा वापर शक्य आहे, अशी माहिती भाजपा तालुका सरचिटणीस प्रकाश माधवराव नागरे यांनी दिली.