सातव्या प्रवाशाचीही कोरोना चाचणी निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:40+5:302020-12-27T04:25:40+5:30
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अलर्ट जारी केल्यानंतर बुलडाणा जिल्हा प्रशासनाने २५ नोव्हेंबर ते २३ ...
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अलर्ट जारी केल्यानंतर बुलडाणा जिल्हा प्रशासनाने २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत इंग्लंडमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ट्रेसिंग सुरू केले होते. २५ डिसेंबरला जिल्हा प्रशासनाची त्यामुळे मोठी धावपळ उडाली होती. या बाबींवर नजर ठेवण्यासाठी एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शेगाव, खामगाव आणि मलकापूर येथील सहा जणांच्या चाचण्या २५ डिसेंबर रोजीच निगेटिव्ह आल्या होत्या, तर सिंदखेड राजा तालुक्यातील एकाची कोरोना चाचणी २५ डिसेंबर रोजी केल्यानंतर रात्री उशिरा त्याचा स्वॅब बुलडाणा येथे पोहोचला होता. त्याचीही तातडीने तपासणी करण्यात आल्यानंतर तो निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने २६ डिसेंबर रोजी सकाळी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात आता जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इंग्लंडमधून आलेल्या एकाचा पत्ता मलकापूर येथील दाखविण्यात येत असला तरी प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती ही सध्या वाशिम जिल्ह्यात असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
पुण्याला अहवाल पाठविण्याची गरज नाही
इंग्लंडमधून आलेल्या सातही जणांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यामुळे त्यांचे अहवाल पुणे येथील ‘एनआयव्ही’ प्रयोग शाळेस पाठविण्याची गरज उरलेली नाही. यातील एकाचा जरी अहवाल पॉझिटिव्ह आला असता तर त्याच्या स्वॅबमध्ये सापडलेल्या विषाणूचा अभ्यास करण्यासोबतच जेनेटिक कोडिंगसाठी तो पुण्याला पाठविणे अनिवार्य होते. तेथेच ती सुविधा उपलब्ध आहे. मात्र सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता हा प्रश्न उरलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.