लिंगा येथे भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:31 AM2021-03-08T04:31:57+5:302021-03-08T04:31:57+5:30
ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती; उपाय याेजना करण्याची मागणी साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई ...
ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती; उपाय याेजना करण्याची मागणी
साखरखेर्डा : सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात नवीन नळयाेजना मंजूर करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी हाेत आहे.
साखरखेर्डा येथून १० कि.मी. अंतरावर लिंगा हे गाव असून, लिंगा-पांग्रीकाटे गट ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम ९५० च्या आसपास आहे. या गावाची तहान भागविण्यासाठी तत्कालीन आमदार तोताराम कायंदे यांनी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करून या गावाची तहान भागविण्यासाठी प्रयत्न केले. राजेगाव धरणाच्या पायथ्याशी पुंजाजी तांगडे यांच्या शेतात विहीर घेण्यात आली. ही विहीर ते गावापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. ही कामे करीत असताना पुंजाजी तांगडे यांचे दानपत्र अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देणे गरजेचे होते. ही नळयोजना मंजूर करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य होते. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दानपत्र घेण्यात आले नाही. त्यावेळी पुंजाजी तांगडे यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. मदत मिळाली नाही तर किमान पाणी सोडण्यासाठी माझ्या मुलाला ग्रामपंचायतीमध्ये कामावर घ्या, अशी मागणी त्यांची होती. प्रत्येक वेळी नवीन आलेला सरपंच त्यांना कोरडे आश्वासन देऊन काम भागवत आला; परंतु त्यांच्या मुलाला २७ वर्षांत एकाही सरपंचाने पाणी देण्यासाठी कामावर ठेवले नाही, तर काहींनी कामावर ठेवले म्हणून मोटार पंप सुरू करण्यासाठी सांगितले. परंतु मजुरी मात्र मिळाली नाही. गरीब शेतकऱ्याची एकप्रकारे थट्टाच केली. गेल्या चार वर्षांपासून पुंजाजी तांगडे यांनी विहीर माझ्या मालकीची असल्याचे सांगून, पाणी पुरवठा बंद केला आहे. मधल्या काळात लिंगा पांग्रीकाटे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पाणी पुरवठा योजनेचे उपमुख्य अभियंता नागापुरे आले. त्यांनी लागलीच नवीन नळयोजना प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविल्याचे समजते. आज मात्र पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने तत्काळ विहीर अधिग्रहण करून पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच मधुकर भालेराव यांनी केली आहे.