सांडपाणी साचते रस्त्यावर, नागरिकांचे आराेग्य धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:04+5:302021-08-29T04:33:04+5:30
देऊळगाव राजा : स्थानिक चिखली रोडवरील पोस्ट ऑफिसच्या मागे असणाऱ्या वार्ड क्रमांक एक मध्ये सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असल्याने ...
देऊळगाव राजा : स्थानिक चिखली रोडवरील पोस्ट ऑफिसच्या मागे असणाऱ्या वार्ड क्रमांक एक मध्ये सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असल्याने स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन उपाय याेजना करण्याची मागणी हाेत आहे़
शहरामध्ये एकीकडे कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत़ त्यामध्ये नाली बांधकाम, रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण अशा प्रकाराचे विकासात्मक कामे चालू आहे़ त्यालाच अपवाद म्हणजे वार्ड क्रमांक एकचा परिसर आहे़ या भागांमध्ये कोणत्याही प्रकारचे नाली बांधकाम रस्ता डांबरीकरण झालेले नाही़ शहरातील मुख्य अशा या परिसरामध्ये पोस्ट ऑफिस कार्यालय, भारतीय स्टेट बँक, विविध प्रकारचे रुग्णालये आहेत़ याविषयी स्थानिक नागिरकांनी वेळाेवेळी निवेदनही दिले आहे़ मात्र, या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतली नाही़ या भागात नाल्या बांधलेल्या नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी रस्त्यावर घाण पाणी साचत आहे़ या पाण्यात डासांची निर्मिती हाेत असल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे़
रस्त्यावरील पाणी शिरले मंदिरात
२८ ऑगस्टला तर थेट रस्त्यावरील घाण पाणी येथील प्रसिद्ध देवस्थान सत्यनारायण मंदिरात शिरल्याने स्थानिक भक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शहरातील या प्रभागाला विकासकामे करण्यासाठी काय राजकारण आड येते असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. यासंदर्भात येथील रहिवासी नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनावर विष्णू राऊत, श्याम गुजर, गोदावरी पवार, दीपाली सपाटे, गजानन कोल्हे, राधाकिसन सपाटे, गजानन भावसार, रवींद्र वनवे, सुरेखा साळी, संगीता लिपारे, रवी जैन, आनंद पिंपळे, संगीता गवळी, सूर्यकांत गवळी, संजय वाघमारे, आदींसह दोनशे जणांची स्वाक्षरी आहे़