खासगी बसमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड
By admin | Published: September 25, 2015 12:09 AM2015-09-25T00:09:57+5:302015-09-25T00:09:57+5:30
अमडापूर येथील घटना; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
अमडापूर (जि. बुलडाणा) : शासनाने महिलांवर होणार्या अत्याचाराविरुद्ध कडक धोरणे केलेली असतानासुद्धा महिलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना वाढत आहेत. ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणार्या एका विद्यार्थिनीची छेडछाड झाल्याची घटना २४ सप्टेंबर रोजी पेठ येथे घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. २३ सप्टेंबर रोजी २0 वर्षीय विद्यार्थिनी पुणे येथून रात्री अमडापूर येथे विघ्नहर्ता ट्रॅव्हल्स बस क्र. एम.एच. ३0 एए ७0७0 ने निघाली होती. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पेठजवळ पोहोचलेल्या धावत्या ट्रॅव्हल्समध्ये सीट क्रमांक २३, २४ वरील आरोपी मो. अशफाक मो. एजास (२३), जिशान अब्दुल्ला अ. हबीब (दोघे रा. बाळापूर ता.जि. अकोला) यांनी विद्यार्थिनीसोबत कोणीही नसल्याचे पाहून ईल संभाषण व त्यानंतर छेडछाड केली. या प्रकाराची सदर विद्यार्थिनीने फोनद्वारे अमडापूर पोलिसांत तक्रार केली. त्याच्या आधारे अमडापूर पोलिसांनी तात्काळ सदर ट्रॅव्हल्सचा ताबा घेऊन तपासणी केली. मो. अशफाक मो. एजास आणि जिशान अब्दुला अ. हबीब या दोघावर भादंविच्या कलम ५0९ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती अमडापूर गावात मिळताच संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सजवळ एकच गर्दी केली होती. त्यांनी या घटनेचा निषेध केला तसेच छेडछाड करणार्या या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. या घटनेचा पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.